Yerwada Cat Dispute Pudhari
पुणे

Yerwada Cat Dispute: ‘मांजराच्या घाणी’वरून येरवड्यात तुफान वाद; शेजाऱ्यांमध्ये मारहाण, प्रकरण पोलिस ठाण्यात

साध्या कारणावरून वाढला वाद; बाचाबाची ते हातघाई, दोन्ही कुटुंबांना कायद्याचा दरवाजा ठोठवावा लागला

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पाळीव प्राण्यांमुळे शेजाऱ्यांमध्ये वाद होण्याच्या घटना नवीन नाहीत. नुकताच ‌‘लव्हबर्ड पोपट विरुद्ध मांजर‌’ वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचल्याची घटना ताजी असतानाच, आता दारात मांजराने केलेल्या घाणीवरून दोन कुटुंबांमध्ये तुफान वाद होऊन तो थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याचा व नंतर या प्रकरणात पोलिस ठाणे गाठावे लागल्याचा प्रकार येरवड्यात घडला.

याप्रकरणी कोमल भास्कर शिरसागर (वय 29, रा. यशवंतनगर, येरवडा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुन्नी सलिम शेख आणि सिबा शेख (दोघी रा. यशवंतनगर) यांच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 18 मार्च 2026 रोजी दीडच्या सुमारास यशवंतनगर परिसरातील साईबाबा मंदिराजवळ घडली. तक्रारदार आणि आरोपी हे एकमेकांचे शेजारी आहेत. घटनेच्या दिवशी आरोपींच्या पाळीव मांजराने तक्रारदारांच्या घराच्या दरवाजासमोर घाण केल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत कोमल शिरसागर यांनी शेजाऱ्यांना जाब विचारत, ‌‘तुमच्या मांजराने घाण केली आहे, ती साफ करा,‌’ अशी मागणी केली. मात्र, समोरच्या बाजूने ‌‘ते मांजर आमचे नाही,‌’ असे उत्तर देण्यात आले. या साध्या वाक्यांपासून सुरू झालेला वाद काही क्षणांतच तापला. दोन्ही बाजूंनी जोरदार बाचाबाची झाली, शिवीगाळ झाली आणि शेवटी हा वाद हातघाईवर आला.

आरोपानुसार, मुन्नी शेख आणि सिबा शेख यांनी कोमल शिरसागर यांना हाताने मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर हा ‌‘दारातल्या घाणीचा‌’ वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आणि दोन्ही कुटुंबांना कायद्याच्या दारात जावे लागले. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही पक्षांना समज देत प्रकरणाची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT