Yerawada Historic Well Pudhari
पुणे

Yerawada Historic Well: येरवड्यात आढळली पेशवेकालीन विहीर! ठेवा जतन करण्यासाठी नागरिकांची धडपड

उड्डाणपुलासाठी ऐतिहासिक वास्तू बुजविली जाण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

येरवडा: येरवडा येथील शहादवलबाबा दर्गा परिसरात उड्डाणपुलाच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामात पेशवेकालीन ऐतिहासिक विहीर उघडकीस आली आहे. या विहिरीत आजही पाणी असून, नैसर्गिक झरेही जिवंत आहेत. मात्र, उड्डाणपुलाच्या कामात ही ऐतिहासिक वास्तू बुजवली जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

यंदा अपुरा पाऊस, धरणांतील घटता पाणीसाठा आणि वाढत्या सिमेंटच्या शहरीकरणामुळे जलस्रोतांचे संवर्धन करण्याची गरज अधिक तीव्र झाली आहे.

अशा परिस्थितीत पाण्याचा नैसर्गिक स्रोत असलेली ही विहीर जतन करण्याऐवजी बुजवली जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ ऐतिहासिक वारसाच नव्हे, तर भविष्यात उपयोगी ठरू शकणारा जलस्रोतही यामुळे नष्ट होण्याची भीती आहे.

दरम्यान, डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागातील संशोधकांनी या विहिरीची पाहणी केली. विहिरीच्या बांधकामात वेगवेगळ्या कालखंडांतील तीन प्रकारचे दगड आढळले आहेत. त्यामुळे या वास्तूचा इतिहास पेशवे कालखंडापूर्वीपर्यंत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तीन थरांतून उलगडला इतिहास!

शहादवलबाबा दर्ग्याजवळ उघडकीस आलेल्या विहिरीच्या बांधकामात तीन प्रकारचे दगड आढळले आहेत. सर्वांत वरचा थर ब्रिटिशकालीन असल्याचे दिसते. विहिरीतून पाणी उपसण्यासाठी पूर्वी मोटेचा वापर केला जात होता. त्यासाठी उभारण्यात आलेल्या व्यवस्थेचा एक खांब आजही विहिरीला जोडलेला आहे.

विहिरीचा सर्वांत खालचा बांधकामाचा थर पेशवे आणि ब्रिटिश काळाच्याही आधीचा असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विहिरीतील नैसर्गिक झरे आजही जिवंत असल्याने तिचे ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच जलस्रोत म्हणूनही जतन होणे आवश्यक आहे.

शहादवलबाबा दर्ग्याजवळील खोदकामात उघडकीस आलेली विहीर पेशवेकालखंडाच्या आधीचीही असू शकते. बांधकामात तीन प्रकारचे दगड आढळले असून, सर्वांत वरचा थर ब्रिटिशकालीन असू शकतो. सर्वांत खालचा बांधकामाचा थर त्याहून अधिक प्राचीन असण्याची शक्यता आहे. याबाबत ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास केल्यानंतर अधिक स्पष्टता येईल.
- डॉ. सचिन विद्याधर जोशी, संशोधक व पुरातत्‍व शास्त्रज्ञ, डेक्कन कॉलेज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT