Yerawada Mental Hospital Pudhari
पुणे

Yerawada Mental Hospital: येरवडा मनोरुग्णालयात रुग्णांची हेळसांड

अस्वच्छता, हलगर्जीपणा आणि अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांची गैरसोय

पुढारी वृत्तसेवा

दीपक नायक

वाघोली: येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात राज्यभरातून शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांची हेळसांड होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. रुग्णालयातील विविध कामे रुग्णांकडून करवून घेतली जात आहेत. वॉर्डांतील अस्वच्छता, कर्मचाऱ्यांची उद्धट वर्तणूक आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र दै. ‌‘पुढारी‌’च्या पाहणीदरम्यान दिसून आले.

या रुग्णालयात सध्या सुमारे 950 मनोरुग्ण उपचार घेत असून, त्यांच्यासाठी 17 वॉर्डांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या वॉर्डांमध्ये मूलभूत सुविधा आणि स्वच्छतेचा अभाव असल्याचे दिसून आले. प्रेरणा वॉर्ड परिसराची (वॉर्ड क्र. 3) पाहणी केली असता तेथील परिस्थिती चिंताजनक असल्याचे चित्र दिसून आले. या ठिकाणी रुग्णांकडून जेवण आणण्याचे काम करवून घेतले जात असल्याचे निदर्शनास आले. अनेक रुग्णांच्या अंगावरील कपडे देखील स्वच्छ नव्हते तसेच वार्डातील फरशा आणि बाथरूमही अस्वच्छ होते. यामुळे वार्डात दुर्गंधी येत होती.

काही रुग्णांनी झोपण्यासाठी वार्डातील फरशीवर मळकटलेली बेडशीट अंथरलेली दिसून आले. वार्डाच्या बाहेर गवत, झाडे वाढल्याने रुग्णांना साप, विंचू यासारख्या विषारी प्राण्यांचा धोका नाही का? असा प्रश्न विचारला असता येथील सुपरवायझरने आत्तापर्यंत कोणालाही दंश झाला नसल्याचे सांगितले. तसेच, झाडाझुडपांमध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचे चित्रही दिसून आले.

वॉर्डच्या बाहेर ड्रेनेजलाइन तुंबल्याने सांडपाणी साचले होते. खिडक्यांच्या काचाही फुटलेल्या होत्या. पुरुष वॉर्डात सर्वत्र अस्वच्छता पसरल्याचे चित्र दिसून आले. रुग्णालयाची विविध कामे रुग्णांकडून करवून घेतली जात असताना कर्मचारी मात्र बाजूला बसून गप्पा मारत होते. रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक या वेळी गैरहजर होते. उपअधीक्षकांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार सुधारणा आणि सुविधा वाढविल्याचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात मनोरुग्णांची हेळसांड होत असल्याचे चित्र दिसून आहे.

वॉर्डाची आतून पाहणी करण्यास मज्जाव

रुग्णांच्या वॉर्डमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता रुग्णालय प्रशासनाकडून त्यास मज्जाव करण्यात आला. अधीक्षक कामानिमित्त बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने पाहणी करता येणार नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सुटीमुळे रुग्णाला दाखल करण्यास नकार

रुग्णालयाच्या निरीक्षणगृहातील वॉर्डातही प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला. जालना येथून एका मनोरुग्णाला दाखल करण्यासाठी त्याचे नातेवाईक रुग्णालयात आले होते. मात्र, महावीर जयंती असल्याचे कारण देत रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे रुग्णासह एक दिवस हॉटेलमध्ये मुक्काम करावा लागल्याचे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले.

कामात अनियमितता करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचे याआधी निलंबन केले आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर यापुढेही अशीच कारवाई करण्यात येईल.
श्रीनिवास कोलोड, अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT