खुटबाव: दौंड तालुक्यातील यवत परिसरात महामार्गाच्या कडेला उभ्या तीन मालवाहू ट्रकमधून 70 हजार 470 रुपये किमतीच्या 810 लिटर डिझेलची चोरी झाल्याची घटना मंगळवारी (दि. 13) रात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत ट्रकचालक नूर मकबुल इस्लाम (वय 27, रा. चांदपूर, ता. उत्तर लक्ष्मीपूर जि. मालडा-उत्तर प्रदेश) यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहितीनुसार, नूर इस्लाम आणि राजू पाल हे दोघे पुणे-सोलापूर महामार्गाने मालवाहू ट्रक (एमएच 43 सीक्यू 1822) आणि एमएच 43 सीक्यू 2202 हे पनवेल-मुंबई येथून टेंभुर्णी एमआयडीसीमध्ये माल भरण्यासाठी निघाले होते.
रात्र झाल्यामुळे ते यवत गावच्या हद्दीतील रॉन्ड 45 या हॉटेलजवळ आराम करण्यासाठी थांबले होते. या वेळी चोरट्यांनी दोघांच्या ट्रकमधून 560 लिटर डिझेल काढून चोरी केली. तसेच सहजपूर हद्दीत असलेल्या सिंधू पंजाबी ढाब्याच्या पार्किंगमध्ये उभ्या जाफर रहिम सुमरा (रा. कच्छपुच्छ, ता. भुज जि. कच्छ) यांच्या ट्रक (जीजे 18 ए झेड 9399) मधूनही 250 लिटर डिझेलची चोरी केली.
यातून चोरट्यांच्या टोळीने एका रात्रीत तीन मालवाहू ट्रकमधून 70 हजार 470 रुपये किमतीच्या 810 लिटर डिझेलची चोरी केल्याचे पुढे आले. यापूर्वी महामार्गाच्या कडेला थांबलेल्या ट्रकमधून डिझेलची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मालवाहू ट्रकमधून डिझेलची चोरी करणारी टोळी सक्रिय असून, अशा चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.