Yavat Crime Pudhari
पुणे

Yavat Crime: 'लग्नात काही दिले नाही', सासरच्यांच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

Yavat Police Station: पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; यवत पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

Yavat Crime Dowry death

यवत: दौंड तालुक्यातील डाळिंब येथे सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी पतीसह सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पती व दीर यांना ताब्यात घेतल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली आहे.

मृत विवाहितेचे नाव वैष्णवी अजिंक्य कांबळे (वय २५) असे असून, तिची आई आशा संतोष साबळे (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी हिचा विवाह १५ जून २०२२ रोजी डाळिंब येथील अजिंक्य कांबळे याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर सुरुवातीला संसार सुरळीत सुरू असला तरी काही दिवसांनी पतीकडून दारूच्या व्यसनामुळे मारहाण व मानसिक त्रास सुरू झाला. "लग्नात काही दिले नाही" अशा कारणांवरून वारंवार टोमणे मारत तिचा छळ केला जात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच सासरच्या इतर सदस्यांकडूनही तिला सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

घटनेच्या आदल्या दिवशी वैष्णवीने आपल्या आईशी दूरध्वनीवर संपर्क साधून सासरच्या छळाबाबत माहिती दिली होती. त्यानंतर झालेल्या वादातून तिला मारहाण झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी तिच्या पतीने आशा साबळे यांना फोन करून वैष्णवीने गळफास घेतल्याची माहिती दिली. उपचारासाठी तिला यवत येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते; मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी अजिंक्य भाऊसाहेब कांबळे (पती), भाऊसाहेब कांबळे (सासरे), लक्ष्मीबाई कांबळे (सासू), स्वप्नील भाऊसाहेब कांबळे (दीर), शेखर भोसले (आतेभाऊ) आणि कदम (सासऱ्यांचा मित्र, रा. उरुळीकांचन) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT