जयदीप जाधव
उरुळी कांचन: गेली 14 वर्षे राजकीय इच्छाशक्तीचा बळी ठरलेल्या व 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या शब्दाने कारखान्याच्या पुनर्जीवीताचा शब्द मिळालेल्या हवेलीकरांना खर्या अर्थाने यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू होण्याचा सूर्योदय पहाण्याचा योग जुळणार आहे.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आपला दिलेला वादा पूर्ण करून कारखान्याच्या भागभांडवल उभारणीसाठी कारखान्याची जमीन विक्रीसाठी राज्य मंत्रिमंडळाची मान्यता दिल्याने कारखाना सुरू होण्याच्या प्रयत्नाला बळ मिळाले आहे. पुणे बाजार समितीच्या मदतीने कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Latest Pune News)
तालुक्यातील भूमिपुत्रांनी पुणे बाजार समितीच्या ठेवीतून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली होती. हीच कल्पना अजित पवार यांनी मान्य करून कारखान्याची जमीन बाजार समितीला उपयोगी पडेल म्हणून जमीन खरेदी प्रस्तावाला संमती दिली होती. आता तोच प्रस्ताव कायदेशीर चौकटीत टिकावा यासाठी मंत्रिमंडळ मान्यतेचे संरक्षण त्याला दिले आहे. त्यामुळे जमीन विक्रीतून भागभांडवल उभे होणार आहे.
राज्य सरकारच्या मान्यतेने होणार्या व्यवहाराला समितीची नेमणूक करून पूर्ण करण्याची सबब अजित पवार यांनी पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे. कारखाना सुरू करण्याचा आर्थिक लेखाजोखा सभासदांपुढे मांडून संचालक मंडळाने आपली कृती करणे अपेक्षित असल्याची चर्चा सभासदांमध्ये सुरू आहे. ‘देर आये पर दुरुस्त आये’ या युक्तीप्रमाणे कारखाना प्रश्न सोडविण्याची भूमिका घेतलेल्या अजित पवार यांच्या निर्णयाने हवेलीत स्वागत होऊ लागले आहे.
बारामती, इंदापुरात घडते, हवेलीत का नाही?
बारामतीत राजकीय विरोध झुगारून पवार कुटुंब लोकसभा व विधानसभेत एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे करणार नाही यासाठी एकी दाखविते. तसाच प्रयत्न छत्रपती कारखान्यात होऊन तिथे सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येतात. मग हवेलीत राजकीय विरोध विसरून एकत्र येणार काय याकडे तालुक्याचे लक्ष पुढील घडामोडींवर असणार आहे.