पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या 100 एकर जागेचे बाजारमूल्य 512 कोटी रुपये असताना कारखाना व्यवस्थापनाने ही जागा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला 299 कोटी रुपयांना विक्रीचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच यशवंत कारखान्याचे आणि सभासदांचे सुमारे 213 कोटी रुपयांचे नुकसान होत असून यामागे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि महायुती सरकारचा आशीर्वाद असल्याचा आरोप यशवंत बचाव कृती समितीचे अध्यक्ष विकास लवांडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
कारखान्याच्या जमीन विक्री व्यवहारास पणन संचालकांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यातील कलम 12(1) ची परवानगी लागते, ती या क्षणापर्यंत मिळालेली नाही. 299 कोटी रुपयांचा जमीन विक्रीचा हा व्यवहार केवळ 500 रुपयांच्या स्टॅम्पवर करून नोटरी करण्यात आला असून, शासनाचे मुद्रांक शुल्क बुडविले आहे. तसेच घाईघाईने बाजार समितीने 36 कोटी 50 लाख रुपये कारखान्यास वर्गसुध्दा केले आहेत. कारखाना अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी हा व्यवहार झाला आहे, तर जिल्हा उपनिबंधक दर्जाचे अधिकारी असलेले बाजार समितीचे सचिव राजाराम धोंडकर यांची कोठेच सही नाही. तर काही संचालकांना हाताशी धरून हा व्यवहार दोन्ही संस्थांच्या अध्यक्षांनी केला आहे.
कारखान्याच्या वार्षिक सभेत मयत सभासदांच्या सह्या घेण्यात आल्याचे समोर आले असून जे उपस्थित नव्हते अशाही सभासदांच्या सह्या नातेवाईकांना आणून मारण्यात आल्या आहेत. बनावट ठराव, बनावट सह्या करून जमिनी विक्री ही तत्काळ सभा गुंडाळून करून टाकण्यात आला आहे. वार्षिक सभेत कारखान्यांनी 12 ठराव घेतले आहेत. त्यामुळे या आर्थिक गैरव्यवहाराविरोधात आम्ही लोणी काळभोर पोलिस स्टेशन आणि पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून दोन्ही संचालक मंडळावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. कारण जमीन उधारीवर विक्री करण्यात आली आहे. हे प्रकरण तपासासाठी आता आर्थिक गुन्हे शाखेकडे गेले आहे. संबंधित दोषींवर गुन्हा दाखल न केल्यास आम्ही न्यायालयासमोर ही बाब आणून देणार असून आंदोलनाच्या तयारीत असल्याचे लवांडे म्हणाले.
यशवंत सहकारी साखर कारखाना हा सहकार कायद्यांतर्गत नोंदला असून जमीन विक्री करावयाची झाल्यास खुल्या लिलाव पद्धतीने तो विक्री झालेला नाही. वास्तविक कारखान्यांवर राज्य सहकारी बँकेचे कर्जच उरले नसल्याचा दावा त्यांनी केला. पुणे बाजार समितीलाच जमीन विक्रीसाठी रेड कार्पेट का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित करून ते म्हणाले, यशवंत कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश जगताप हे दोघे सख्खे भाऊ आहेत. एकीकडे भोर तालुक्यातील राजगड कारखान्याला महायुती सरकार मदत करते आणि थेऊर साखर कारखान्याला लुटले जाते.
यशवंतच्या जमीन विक्री संगनमताने व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने हा व्यवहार झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयातील 5270/2025 ही आमची रिट पिटीशन दाखल असून, सुनावणी चालू आहे. जमीन विक्रीच्या राज्य सरकारच्या शासन निर्णयात या याचिकेचा उल्लेख केला असून त्यातील निर्णयास अधीन राहून कार्यवाहीची सर्वस्वी जबाबदारी यशवंत कारखाना व पुणे बाजार समिती या दोन्ही संस्थांची राहील असे नमूद आहे. याचिकेवरील कोणताही निर्णय झालेला नसतानाच जमिनी विक्री मनमानी पध्दतीने सुरू असल्याचेही लवांडे म्हणाले.