पुणे: एकेकाळी सायंकाळी ठराविक वेळी दूरदर्शनवर लागणाऱ्या कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहिली जायची. मोजक्या वाहिन्या, ठराविक कार्यक्रम आणि टीव्ही सुरू किंवा बंद करण्यासाठी प्रत्यक्ष बटण दाबण्याची सवय...असा दूरचित्रवाणीचा काळ होता.
रविवारची सकाळ असो किंवा सायंकाळची वेळ, आवडत्या मालिकेसाठी अथवा चित्रपटासाठी संपूर्ण कुटुंब टीव्हीसमोर एकत्र बसायचे. मात्र, काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले आणि त्याबरोबरच आता टीव्हीचे रूपही पूर्णपणे बदलले आहे.
आता केवळ कार्यक्रम पाहण्यापुरता टीव्ही मर्यादित राहिलेला नाही, तर इंटरनेट, व्हॉइस कमांड, ओटीटी व्यासपीठ आणि विविध ॲप्समुळे तो मनोरंजनाचे स्मार्ट केंद्र बनला आहे. विशेष म्हणजे टीव्हीवर एआय ॲपही चालवता येत असून, कृष्णधवलपासून ते व्हाइस कंमांडपर्यंतचा असा स्मार्ट टीव्ही प्रत्येकाच्या घरात आला आहे.
शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर) असलेल्या जागतिक दूरचित्रवाणी दिनानिमित्त दै. ‘पुढारी’ने दूरचित्रवाणीच्या बदलत्या प्रवासाचा आढावा घेतला. पूर्वी घरात टीव्ही असणे हीच मोठी गोष्ट मानली जायची. सुरुवातीला कृष्णधवल आणि त्यानंतर रंगीत टीव्ही असा बदल अनुभवायला मिळाला.
दूरदर्शनवरील मालिका, चित्रपट, बातम्या, गाणी, शेतीविषयक कार्यक्रम आणि रविवारच्या विशेष कार्यक्रमांना प्रेक्षकांची पसंती असायची. कार्यक्रमांच्या वेळा ठरलेल्या असल्याने त्यानुसार घरातील कामांचे नियोजन केले जायचे. टीव्हीवर चित्र स्पष्ट दिसत नसल्यास अँटेना फिरवणे, रिमोटऐवजी टीव्हीवरील बटणे वापरणे, अशा आठवणी आजही अनेकांच्या मनात आहेत. त्यानंतर केबल नेटवर्क आणि डिश टीव्हीचे आगमन झाले.
वाहिन्यांची संख्या वाढली आणि विविध विषयांवरील कार्यक्रम उपलब्ध झाले. प्रेक्षकांना आपल्या आवडीचे कार्यक्रम निवडण्याची संधी मिळाली. मात्र, इंटरनेटच्या प्रसारानंतर दूरचित्रवाणीच्या क्षेत्रात आणखी मोठे परिवर्तन घडले आहेत.
आता यूट्यूब, ओटीटी व्यासपीठे आणि विविध ॲप्स थेट टीव्हीवर वापरता येतात. चित्रपट, वेबसीरिज, माहितीपट, गाणी किंवा आवडीचे कार्यक्रम पाहण्यासाठी ठराविक वेळेची वाट पाहावी लागत नाही. आपल्या सोयीनुसार आशय निवडणे, कार्यक्रम थांबवून नंतर पुन्हा पाहणे शक्य झाले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनासाठी अधिक स्वातंत्र्य मिळाले आहे.
आठवणी जुन्या; तंत्रज्ञान नवे!
विज्ञान आणि तंत्रज्ञानात काळानुसार बदल होत गेले आणि त्याचा परिणाम दूरचित्रवाणीवरही झाला. पूर्वी दूरदर्शनवर ठराविक कार्यक्रम असायचे. मोजक्याच वाहिन्या उपलब्ध होत्या. टीव्ही सुरू किंवा बंद करण्यासाठी प्रत्यक्ष बटण दाबावे लागायचे. त्या काळातील कार्यक्रमांच्या अनेक आठवणी आजही मनात आहेत.
मात्र, आताच्या स्मार्ट टीव्हीमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून ओटीटी व्यासपीठही वापरता येतात. त्यामुळे टीव्हीवर काय पाहायचे, हे आता प्रेक्षक स्वतः ठरवू शकतात. चक्क ऑनलाइन शॉपिंगही करता येते. एवढेच नव्हे टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनमुळे घरातच चित्रपट पाहत असल्याची अनुभूती मिळते.