नैराश्याच्या सावटाखाली बालपण; आत्महत्येकडे वळताहेत पावले Pudhari
पुणे

Suicide Prevention Day: नैराश्याच्या सावटाखाली बालपण; आत्महत्येकडे वळताहेत पावले

राष्ट्रीय स्तरावरील आकडेवारीनुसार 2021 मध्ये 18 वर्षांखालील तब्बल 10 हजारांहून अधिक मुलांनी आत्महत्या केली.

पुढारी वृत्तसेवा

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे: राज्यात लहान मुले आणि विद्यार्थ्यांमधील आत्महत्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. देशभरातील विद्यार्थी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. शासकीय अहवालानुसार, गेल्या वर्षी राज्यात तब्बल 1,764 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. शैक्षणिक दडपण, वाढत्या स्पर्धेमुळे येणारे नैराश्य, बदलत्या सामाजिक परिस्थितीचा ताण, यामुळे बालपण नैराश्याच्या सावटाखाली असून, आत्महत्येचा टोकाचा विचार धोकादायक असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

राष्ट्रीय स्तरावरील आकडेवारीनुसार 2021 मध्ये 18 वर्षांखालील तब्बल 10 हजारांहून अधिक मुलांनी आत्महत्या केली. शिक्षणातील दडपण, कौटुंबिक वाद, नैराश्य, तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकतेचा अभाव, ही प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पुणे, नागपूर, नाशिक यांसारख्या शहरांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण विशेषतः जास्त असल्याचे दिसून आले आहे. (Latest Pune News)

विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण दुहेरी वेगाने वाढत आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांमध्ये समुपदेशन केंद्र, हेल्पलाइन नंबर आणि मानसिक आरोग्य तपासणी या गोष्टी बंधनकारक करणे गरजेचे आहे, असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अंजली कुलकर्णी यांनी व्यक्त केले. राज्यात आत्महत्येच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य व शिक्षण विभागाने संयुक्तपणे कृती आराखडा राबविणे आवश्यक असल्याची मागणी तज्ज्ञ व सामाजिक संस्थांनी केली आहे. लहान मुलांमधील आत्महत्या रोखणे, ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आत्महत्येस प्रवृत्त करणारी कारणे

  • शैक्षणिक दडपण व परीक्षा निकालांची भीती

  • पालकांकडून किंवा शिक्षकांकडून अवास्तव अपेक्षा

  • कौटुंबिक कलह, घटस्फोट किंवा दुर्लक्ष

  • नैराश्य, एकटेपणा आणि आत्मविश्वासाचा अभाव

  • मित्रपरिवारातील वाद, छळ किंवा नकार

  • सोशल मीडियाचा अतिरेक, तुलना व नकारात्मक प्रभाव

  • न बोलता येणाऱ्या मानसिक आरोग्य समस्या

लहान मुलांमध्ये आत्महत्या ही गंभीर सामाजिक व मानसिक आरोग्याची समस्या आहे. अभ्यासाचा दबाव, कौटुंबिक तणाव, मोबाईल व सोशल मीडियावरील तुलना, यामुळे ते नैराश्याच्या गर्तेत जातात. अशावेळी पालकांनी मुलांशी सतत संवाद साधणे, त्यांना ऐकून घेणे आणि भावनिक आधार देणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास जीव वाचवता येऊ शकतो.
- डॉ. अनिल नेने, मानसोपचारतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT