डासांचा पर्यावरणपूरक नायनाट ठरतोय लक्षवेधी; बायोलार्व्हिसायडल कीटकनाशकांचा वापर  Pudhari File Photo
पुणे

World Mosquito Day: डासांचा पर्यावरणपूरक नायनाट ठरतोय लक्षवेधी; बायोलार्व्हिसायडल कीटकनाशकांचा वापर

लस विकसित होईपर्यंत डासांचा नायनाट हा एकमेव उपाय आहे.

पुढारी वृत्तसेवा

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे: डासांमुळे होणार्‍या डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव पावसाळ्यात वाढतो. सध्या मलेरिया, डेंग्यूवरील लसींच्या चाचण्या शेवटच्या टप्प्यात आहेत. लस विकसित होईपर्यंत डासांचा नायनाट हा एकमेव उपाय आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून पर्यावरणपूरक कीटकनाशकांचा वापर करण्याची शक्कल लढवली जात आहे. द्रवामुळे डासांच्या अळ्यांचा नायनाट होतो आणि पाण्यातील इतर परिसंस्थांना हानी पोहचत नाही.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बायोलार्व्हिसायडल लिक्विड हे पर्यावरणपूरक द्रव्य आहे. यात रासायनिक कीटकनाशकांचा वापर नसल्याने पाणी, प्राणी, पक्षी वा मनुष्य यांच्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. हे द्रव पाण्याच्या साचलेल्या जागेत, गटार, टाक्या, फुलदाणी, थंडगार पाण्याच्या कुलरमध्ये टाकले असता डासांच्या अळ्या नष्ट होतात.  (Latest Pune News)

त्यामुळे डासांचे प्रजनन थांबते आणि आजारांचा धोका कमी होतो. महाराष्ट्रात विशेषतः शहरी भागात डेंग्यू, चिकनगुनियाचे प्रमाण वाढत असल्याने पुणे, मुंबई, नागपूरसह अनेक महानगरपालिका व नगरपरिषदा या द्रवाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव अधिक असल्याने नागरिकांमध्ये जनजागृती करून, त्यांना बायोलार्व्हिसायडल लिक्विडचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.

काय आहेत फायदे?

केंद्र शासनाची नॅशनल सेंटर फॉर व्हेक्टरबोर्न डिसीज कंट्रोल ही संस्था डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी कोणती औषधी वापरावीत, हे ठरवते आणि त्यामध्ये बायोलार्व्हिसायडल द्रचांचा समावेश आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने डासांच्या अळ्या मारण्यासाठी पाण्यात वापरण्याची आठ प्रकारची औषधे नोंदवली आहेत. यामध्ये चार रासायनिक आणि चार बायोलार्व्हिसायडल आहेत. ही औषधे इतर घटकांना घातक ठरत नाहीत.

बायोलार्व्हिसायडल द्रव वापरलेले पाणी पिण्यास योग्य असते. प जिथे पाण्याची टंचाई तिथे दररोज पाणी फेकून देता येत नाही. त्यामुळे बायोलॉजिक औषधे उपयुक्त ठरतात.

बायोलार्व्हिसायडल द्रव जीवाणूआधारित असून, दूषित आणि स्वच्छ पाण्यामध्ये याचा वापर केल्यास डासोत्पत्ती स्थाने नष्ट होतात. नाले, डबकी यामध्ये दर 15 दिवसांनी बायोलॉजिकल द्रवाचा वापर केल्यास डासांची लोकसंख्या निश्चित कमी होते. त्यामुळे कीटकजन्य आजारांचा प्रसार कमी होतो. पर्यावरणपूरक द्रवाचा वापर केल्याने पाण्यातील इतर सजीव घटकांना हानी पोहचत नाही.
- डॉ. राजेश दिघे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT