पुणे: अनेक दाम्पत्यांना पहिले अपत्य सहज होते. मात्र, दुसर्यांदा गर्भधारणा करण्यात अडथळे येतात. या स्थितीस ‘सेकंडरी इन्फर्टिलिटी’ (दुय्यम वंध्यत्व) म्हणतात. भारतात विशेषतः शहरी भागामध्ये या समस्येचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
अंडाशयाचे अकाली वृद्धत्व, तणावपूर्ण जीवनशैली, हार्मोनल असंतुलन आणि प्रदूषण, यांसारखी कारणे यामागे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अशा स्थितीमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेऊन आयव्हीएफ उपचारांबाबत निर्णय घेता येऊ शकतो. (Latest Pune News)
पीसीओएस, थायरॉइड विकार, पूर्वीचा संसर्ग, गर्भाशयातील अडथळे, पुरुषांमध्ये स्लीप डिसऑर्डर किंवा धूम्रपान, अशी सेकंडरी इन्फर्टिलिटीची अनेक कारणे असू शकतात. समस्या गंभीर असली तरी ती उपचारक्षम आहे. वेळेवर वैद्यकीय सल्ला, योग्य चाचण्या, जीवनशैलीतील सुधारणा, यामुळे दुसर्या अपत्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. जागरूकता आणि त्वरित कृती, हेच यशाचे सूत्र आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
अनेक स्त्रियांमध्ये अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता लवकर कमी होत असल्याचे दिसते. विशेषतः तिशीनंतर ही प्रक्रिया वेगाने सुरू होते. त्यामुळे पहिले मूल झाल्यावर दुसर्यांदा गर्भधारणा होण्यात विलंब किंवा अपयश येते. वेळेवर निदान आणि उपचार हे यशाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.- डॉ. सुनीता तांदुळवाडकर, प्रसूती व स्त्रीरोग विभागप्रमुख, रुबी हॉल क्लिनिक
35 वर्षांखालील महिलांनी एक वर्ष प्रयत्न करूनही गर्भधारणा न झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. एएमएच चाचणी आणि पेल्व्हिक अल्ट्रासाउंड यांद्वारे अंडाशयाची स्थिती समजू शकते. नवीन उपचार पद्धतींमुळे आता दुय्यम वंध्यत्वावर प्रभावी उपाय शक्य आहेत.- डॉ. स्वाती देशमुख, प्रजननतज्ज्ञ