पुणे : नियमित व्यायाम, धावणे किंवा जिम वर्कआउट करणार्यांनाही अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यांत राज्यात फिटनेसप्रेमींचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. आनुवंशिक घटक, कोलेस्टेरॉल वाढ, उच्च रक्तदाब किंवा हार्मोन्समध्ये बिघाड ही हृदयविकाराची छुपी कारणे असू शकतात, याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे.
फिटनेस किंवा सडपातळ शरीर याचा अर्थ नेहमीच हृदय पूर्णपणे निरोगी आहे असा होत नाही. अत्याधिक व्यायाम, निर्जलीकरण, चुकीचा आहार किंवा ताणतणावामुळेही अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. नियमित आरोग्य तपासणी, ईसीजी, 2डी-ईको, लिपिड प्रोफाइल यांसारखी चाचणी करणे आवश्यक आहे. व्यायाम सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे, हळूहळू व्यायामाची पातळी वाढवणे, तसेच थकवा, छातीत दुखणे किंवा धडधड वाढल्यास तत्काळ व्यायाम थांबवून वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे, असा सल्ला रूबी हॉल क्लिनिकचे इंटरव्हेन्शनल कार्डियोलॉजिस्ट डॉ. हर्षल इंगळे यांनी दिला आहे.
फिटनेस असूनही ह्रदयविकाराचा धोका वाढण्यामागची कारणे :
1) छुपे आजार: अनेकदा व्यक्तीला माहीत नसलेले काही ह्रदयाचे आजार असू शकतात, जसे की ’हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी’ (हृदयाच्या स्नायूंची अनैसर्गिक वाढ). तीव्र व्यायाम करताना, या सुप्त आजारांमुळे अचानक ह्रदयावर ताण येऊ शकतो, ज्यामुळे झटका येऊ शकतो.
2) प्लॉकचा थर: ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कमी प्रमाणात चरबीचा थर (प्लॉक) असला, तरी तीव्र व्यायामामुळे तो प्लॉक फुटू शकतो. यामुळे रक्ताची गुठळी होऊन रक्तप्रवाह पूर्णपणे थांबतो आणि ह्रदयविकाराचा झटका येतो.
3) अति-व्यायाम आणि तणाव: शरीराला पुरेसा आराम न देता सतत अति-व्यायाम केल्यास शरीरात अंतर्गत सूज निर्माण होते. यामुळे ह्रदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
4) आनुवंशिकता : कुटुंबात कमी वयातच ह्रदयाच्या आजारांचा इतिहास असेल, तर तुमची फिटनेस पातळी कितीही चांगली असली तरी धोका जास्त असू शकतो.
5) सप्लिमेंट्सचा वापर: काही वेळा ’प्री-वर्कआउट’ सप्लिमेंट्स किंवा इतर कार्यक्षमता वाढवणार्या औषधांमुळे ह्रदयाचे ठोके आणि रक्तदाब अनियंत्रित होतो, ज्यामुळे ह्रदयावर ताण वाढतो.
प्रत्येक फिटनेस प्रेमीने आपल्या शरीराची भाषा समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. छातीत दुखणे, धाप लागणे किंवा चक्कर येणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. कौटुंबिक इतिहास असल्यास, डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घेणे हा एक महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. फिटनेस निश्चितच चांगला आहे, पण तो ह्रदयविकारापासून 100% सुरक्षा देतो, असे नाही.डॉ. हर्षल इंगळे, इंटरव्हेन्शनल कार्डियोलॉजिस्ट, रूबी हॉल क्लिनिक
बाहेरून पूर्णपणे निरोगी दिसणार्या व्यक्तींनाही अचानक हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, विशेषत: कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असेल, उच्च रक्तदाबाची लक्षणे ओळखली गेली नसतील किंवा सूक्ष्म कोलेस्टेरॉल असंतुलन असेल. पुरेशी विश्रांती न घेता तीव्र व्यायाम करणे, शरीरात पाणी कमी होणे किंवा न ओळखलेले हृदयाच्या ठोक्यांचे विकार (अरिदमिया) देखील अशा घटना घडवू शकतात. आजच्या वेगवान जीवनशैलीत फिटनेसची व्याख्या हृदयाच्या विशिष्ट तपासण्या आणि देखरेख यामध्ये वाढवणे आवश्यक आहे. खरा फिटनेस म्हणजे व्यायामासोबत वैद्यकीय जागरूकता आणि वेळेवर तपासण्या-कारण प्रतिबंध हाच हृदयासाठी सर्वोत्तम उपचार आहे.डॉ. अमित जिंदाल, असोसिएट कन्सल्टंट, कार्डिओलॉजी, बीएलके मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल