पुणे

World Happiness Day : आनंदी राहण्यासाठी वाढवा ‘ह्या’ दोन लेव्हल

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सध्याच्या धावपळीच्या युगात अनेक जण भूतकाळातील आठवणी आणि भविष्यातील चिंता करीतच जगत आहेत. त्यामुळे आनंद म्हणजे काय, हे अनेक जण विसरलेले आहेत. त्यामुळे 'चला लवचिक होऊया, इतरांना आनंदी करूया,' असे आवाहन मानसोपचारतज्ज्ञांनी केले आहे. तसेच आनंदी राहण्यासाठी सेरोटोनिन, डोपामाइनसारख्या आनंदी संप्रेरकांची शरीरातील लेव्हल वाढवावी आणि वर्तमानात आनंदी जगायला शिकणे गरजेचे आहे, असा मौलिक सल्ला त्यांनी दिला आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सेरोटोनिन, डोपामाइन, एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिन यांसारखे संप्रेरक आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतात आणि म्हणून त्यांना 'आनंदी संप्रेरक' असेही म्हणतात. या संप्रेरकांची निर्मिती व्हावी, यासाठी व्यायाम, सकारात्मक द़ृष्टिकोन, सकस आहार, चांगले मित्र जोडणे, आंनदी राहणे या गोष्टी करणे गरजेचे आहे. डोपामाइन आणि सेरोटोनिन हे रेणू आहेत जे संपूर्ण शरीरात सिग्नल पाठवतात; ही रसायने आपल्या भावनांवर परिणाम करतात. जेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन सोडले जाते तेव्हा आपल्याला तात्पुरत्या आनंदाची भावना येते. सेरोटोनिन, डोपामाइनप्रमाणेच, आनंदाची किंवा कल्याणाची दीर्घकाळ टिकणारी भावना निर्माण करते.

दिशा पब्लिकेशन आणि सायकॉलॉजी कन्सल्टन्सीची संचालिका अपर्णा चव्हाण म्हणाल्या, यंदा जागतिक आनंदाचा दिवस साजरा करण्यासाठी आनंदासाठी लवचिक समुदाय तयार करणे ही थिम ठेवली आहे. त्यानुसार लवचिकता म्हणजेच रेझेलियन्स याचाच अर्थ की जितका माणूस लवचिक असेल तितका तो इतरांशी सहज सामावून घेतो. आपल्याकडे लवचिक वनस्पती असतात त्या ऊन, वारा, पावसात टिकतात तसेच पाण्याचे पण बघा पाण्याला पण जिथे जाता येईल तिथं पटकन पाणी जातं, तशाच प्रकारे लवचिकता असलेला माणूस सहज आनंदी जगू शकतोे. म्हणूनच या हॅपिनेस डे ला लवचिक होऊया आणि इतरांना आनंदी करूया. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विद्याधर बापट म्हणाले, संगीत हे एक उत्तम औषध आहे. मन:स्थिती सुधारण्यासाठी रोज संगीताची साधना, आवडते संगीत रोज ऐकणे, कविता वाचणे, ऐकणे, आवडता छंद जोपासणे याची खूप मदत होते. सकारात्मक स्वयंसूचनेची तंत्रे, स्वत:ला स्वस्थ करून स्वयं सूचना देणे हे सगळे शिकून घ्यायला हवे.

सेरोटोनिन म्हणजे काय?

सेरोटोनिन हे आणखी एक रसायन आहे, जे आपल्या शरीरात संदेश पाठवते. हे शरीराला कसे कार्य करावे, हे सांगते आणि आपला आनंद, स्मृती, झोप, शरीराचे तापमान आणि भूक नियंत्रित करण्यास मदत करते.

डोपामाइन म्हणजे काय?

डोपामाइन हे एक रसायन आहे, जे आपल्या मेंदू आणि शरीरातील तंत्रिका पेशींमध्ये संवाद साधते. हे आनंद संप्रेरक म्हणून ओळखले जाते; कारण जेव्हा आपण काहीतरी करत असतो ज्यामुळे आपल्याला चांगले वाटते तेव्हा ते सोडले जाते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT