सुवर्णा चव्हाण
पुणे: अगदी दोन दिवसांत पुस्तकांच्या 122 प्रती छापून हव्या आहेत... हो, आता हे शक्य झालेय प्रिंट ऑन डिमांडमुळे... ‘मागणी तसा पुरवठा’ या सूत्राने आता मराठी पुस्तकविश्वातही प्रवेश केला आहे. प्रिंट ऑन डिमांड हे प्रिटिंग तंत्रज्ञान असून, जेवढ्या प्रतींची मागणी तेवढेच प्रिटिंग हे सूत्र या प्रक्रियेत अवलंबले जात आहे. या प्रक्रियेद्वारे पुस्तकांच्या प्रती छापून घेण्याची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पुण्यातील जवळपास 60 ते 70 टक्के प्रकाशन संस्था याद्वारे पुस्तक छपाई करीत आहेत.
आधी पुस्तक छापून घेण्यासाठी मोठा कालावधी लागायचा... पण, जसा काळ बदलत आहे तसे मराठी पुस्तकविश्वातही नवे तंत्रज्ञान आत्मसात केले जात आहे. आता प्रिंट ऑन डिमांड या डिजिटल प्रिंटिंग प्रक्रियेचाही मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. पुस्तकनिर्मितीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वेळ येते ती प्रिटिंगची... काही वर्षांपूर्वी पुस्तकांच्या एक ते दोन हजार प्रती छापल्या जायच्या.
पण, आता तसे होताना दिसत नाही... पुस्तकांच्या भरपूर प्रती छापण्याची जोखीम प्रकाशक घेताना दिसत नाहीत. काही प्रकाशक प्रिंट ऑन डिमांडचा वापर करून मागणीप्रमाणे पुस्तकांच्या प्रती छापून देत आहेत. याचा प्रकाशकांना फायदाही होत आहे. बुधवारी (दि. 22) साजरा होणार्या जागतिक पुस्तक दिनानिमित्त दै. ‘पुढारी’ने याविषयीचा आढावा घेतला.
याविषयी संस्कृती प्रकाशनच्या सुनीताराजे पवार म्हणाल्या, कोरोना काळानंतर प्रिंट ऑन डिमांडचा वापर वाढला आहे. आज पुस्तकांच्या जास्त प्रती छापण्याची जोखीम प्रकाशक घेताना दिसत नाही. त्यामुळेच प्रिंट ऑन डिमांड ही संकल्पना आम्ही प्रकाशकांनी स्वीकारली आहे. आम्ही सुद्धा गेल्या काही वर्षांत सुमारे 100 पुस्तके या प्रक्रियेनुसार छापले असून, या प्रक्रियेला आता प्रतिसाद मिळू लागला आहे.
हव्या तेवढ्याच पुस्तकांची छपाई शक्य
पुस्तकविश्वात पुस्तकांच्या प्रती किती खपल्या, याला मोठे महत्त्व असते. काही वेळा पुस्तकाची एक आवृत्तीही संपत नाही. त्यामुळेच आता प्रकाशकांकडून प्रिंट ऑन डिमांडचा आधार घेतला जात आहे. एरवी पुस्तकांची छपाई ऑफसेट प्रिंटिंग या तंत्राने केली जाते. त्यात प्लेट तयार करून पाचशे-हजार पुस्तके छापली जातात. मात्र, प्रिंट ऑफ डिमांड तंत्रज्ञानामध्ये प्लेट तयार करण्याची गरज राहिलेली नाही. या तंत्रामुळे पाहिजे तेवढ्याच पुस्तकांची छपाई करता येते.
प्रिंट ऑन डिमांडचा ट्रेंड मराठी प्रकाशनविश्वातही वाढला आहे. या प्रक्रियेमुळे पुस्तकांच्या मागणीचा अंदाज घेऊन त्याद़ृष्टीने पुस्तके छापणे सोयीचे ठरते. ही प्रक्रिया कमी कालावधीत होत असल्यामुळे याला मागणीही वाढू लागली असून, एक हजार प्रतींपेक्षा मोजक्याच प्रती छापण्याकडे कल वाढू लागला आहे. त्यासाठी प्रिंट ऑन डिमांडचा आधार घेतला जात आहे. प्रिंट ऑन डिमांडद्वारे पुस्तकाच्या प्रती छापण्याचा खर्च जरी जास्त असला तरी ही प्रक्रिया खूप सोईस्कर आहे. गेल्या काही वर्षांत पुस्तकांच्या प्रती किती विकल्या जातील याचे अंदाज बदलले असल्यामुळे हजारो प्रती छापण्याची जोखीम घेण्यापेक्षा प्रिंट ऑन डिमांडद्वारे कमी प्रती छापण्याला महत्त्व दिले जात आहे.- रोहन चंपारनेरकर, रोहन प्रकाशन