पुणे

जागतिक सायकल दिन विशेष | सायकली वाढल्या, मात्र चालवणार कुठे?

Sanket Limkar

पुणे : पुढारी वृत्तसेवा : स्वस्त, मस्त आणि वाट्टेल तेव्हा वाट्टेल तिथे घेऊन जाता येणार्‍या सायकलचा प्रवास गेल्या शंभर वर्षांत गरिबाची सवारी ते स्टेट्स सिम्बॉल असा झाला आहे. सायकल सर्वांनाच हवी हवीशी वाटते. मात्र वाढत्या वाहनांच्या गर्दीत ती दिवसा घराबाहेर काढणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक शहरात मॉर्निंग आणि नाईट सायक्लिंग क्लब बाळसे धरत आहे. भारतात सायकलची विक्री 9.4 टक्क्यांनी वाढली असून 2024 ते 2034 या दहा वर्षांत ती विक्रमी टप्पा गाठेल असा दावा सायकल तज्ज्ञांनी केला आहे.

जागतिक सायकल दिन

3 जून हा जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो. सायकल ही वापरण्यास, विकत घेण्यास सोपी आणि स्वस्त आहे. सर्वांना सामावून घेणारे जागतिक स्तरावरील वाहन म्हणून सायकलकडे पाहणे, यासाठी सायकल दिन साजरा करण्याचे ठरविले गेले. एप्रिल 2018 मध्ये संयुक्त राष्ट्र समितीने 3 जून रोजी हा दिवस विश्व सायकल दिन म्हणून निश्चित केला.

ब्रिटिशांनी सायकल भारतात करमणुकीचे साधन म्हणून आणली. जगाप्रमाणेच भारतात सायकल संस्कृती रुजली. जगात चीननंतर सर्वाधिक सायकल विक्री भारतात होते. दर वर्षाला देशात 1 कोटींपेक्षा जास्त सायकलींची निर्मिती केली जाते.

कोरोनात समजले सायकलचे महत्त्व

कोरोनामुळे लोकांचे रस्त्यावर फिरण्याचे प्रमाण कमी झाले होते. अनेकांनी त्या काळात स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी सायकलचा वापर केला. तेव्हापासून सायकलचा भाव आणखी वाढला अन् तिचे महत्त्वही पटले. सायकल चालवल्याने वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय स्नायू बळकट होतात. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सायकल चालवणे हा देखील एक चांगला उपक्रम आहे.

सायकलच्या प्रवासातील स्थित्यंतरे

  • 1920 च्या सुमारास सायकल हे वाहतुकीचे प्रमुख साधन होते.
  • भारतात बि—टिशांनी करमणूक म्हणून सायकल आणली. त्यानंतर गरीब-कामगार वर्ग अन् व्यापार्‍यांत साहित्य वाहून नेण्याचे वाहन म्हणून लोकप्रिय झाली.
  • गरीब माणसाच्या सवारीपासून ते स्टेट्स सिम्बॉलपर्यंत झाला प्रवास.
  • आजही वृत्तपत्र विक्रेते, दूध विक्रेते, पोस्टमन आणि डब्बावाले स्वस्त वाहतुकीचा पर्याय म्हणून सायकलींचा वापर करतात.
  • ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चरर्स असो. आकडेवारीनुसार 2022-23 मध्ये देशात 1 कोटी 4 लाख 20 हजार सायकलींची विक्री झाली.
  • 2023-24 या वर्षात 1 कोटी 6 लाख 71 हजार 582 सायकलींची (2.4 टक्के वाढ) विक्री झाली.

सायकलींची विक्री वाढत असली तरी वाढत्या वाहनांमुळे रस्त्यांवरील सायकल ट्रॅक गायब झाल्याने ती चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे सायकल स्पर्धा हे एक मोठे आव्हान ठरत आहे. वीस वर्षांपूर्वी आम्ही सतत सायकलच्या स्पर्धा भरवत होतो.

तेव्हा वाहनांची संख्या मर्यादित होती. आता दुचाकी आणि चारचाकींची संख्या प्रचंड वाढल्याने शहरात सायकल ट्रॅकच शिल्लक नाहीत. अनेक वेळा शासनाकडूनही या स्पर्धांना परवानगी मिळत नाही. आता फक्त बालेवाडीच्या मैदानात स्पर्धा घेतो.

-संजय कांबळे, सचिव, पुणे सायकलिंग असोसिएशन

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT