worker trapped under soil dies
पुणे: नांदेड सिटीतील कलाश्री इमारतीसमोरील असलेल्या ड्रेनेज पाइपलाइनच्या कामावेळी चार कामगारांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्याची दुर्घटना सोमवारी (दि. 4) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
या वेळी अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन ढिगार्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढले, तर एका कर्मचार्याला रात्री सव्वानऊच्या सुमारास ढिगारा उपसून बाहेर काढण्यात आले. परंतु, त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. कनिराम प्रजापती असे मृत कर्मचार्याचे नाव आहे. (Latest Pune News)
नांदेड सिटी परिसरात असलेल्या कलाश्री नावाच्या सोसायटीपासून दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर जंगल परिसरात महापालिकेच्या जायका विभागाकडून ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम सुरू होते. या वेळी जेसीबीच्या साह्याने पाइपलाइनसाठी खड्डा करण्याचे काम सुरू होते.
खड्डा 15 ते 20 फुटांचा या वेळी खोदून झाला होता. या वेळी खड्डा आणि परिसरात एकूण पाच कामगार काम करीत होते. ढिगारा घरसल्यानंतर यातील तीन जण त्या मातीत गाडले गेले. यात चेतलाल प्रजापती, खुर्शीद अली आणि कनिराम प्रजापती अशी ढिगार्याखाली गाडलेल्यांची नावे आहेत.
यातील दोघांना बाहेर काढून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले, तर कनिराम प्रजापती यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. हे सर्व झारखंडचे असल्याची माहिती आहे. सायंकाळी काम संपवून निघण्याअगोदरच पावणेसहाच्या सुमारास अचानक मातीचा कडेला टाकलेला ढिगारा चार कर्मचार्यांच्या अंगावर कोसळला अन् चार जण या खड्ड्यात ढिगार्याखाली अडकले गेले. या वेळी खड्ड्यात एका बाजूला उभ्या असलेल्या इतर कर्मचार्यांनी आरडाओरडा केल्यानंतर एकाने या दुर्घटनेची तत्काळ खबर अग्निशमन दलाला दिली.
तसेच, उपलब्ध जेसीबीच्या मदतीने काही ढिगारा बाजूला केला. काही मिनिटांतच पीएमआरडीचे अग्निशनम दलाचे जवान, नांदेड सिटी पोलिस तसेच महापालिकेचे आपत्ती प्रतिसाद पथक दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी खोदकाम करून दोघांना रात्र होण्याअगोदर बाहेर काढले. त्यांना तत्काळ नांदेड सिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी दाखल केले. रात्री उशिरा अडकलेल्या एका कामगाराला अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री उशिरा नऊच्या सुमारास ढिगार्याखालून बाहेर काढले.
त्यालाही तत्काळ जवळच्या रुग्णालयात पुढील उपचारांसाठी हलविण्यात आले. मात्र, त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे अग्निशमन दलाने सांगितले. पीएमआरडीए-पुणे अग्निशमन दल, पुणे महानगरपालिका अग्निशमन दल, नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे अधिकारी अंमलदार, 108 रुग्णवाहिकेसह डॉक्टरांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. या वेळी महापालिका सहायक आयुक्त प्रज्ञा पोतदार-पवार, महापालिका उपअभियंता नितीन साबळे, रुग्णालयाचे डॉ. रवींद्र कचरे, डॉ. अशोक पाटील, भाजपचे मंडल अध्यक्ष रूपेश घुले यांनी घटनास्थळी धाव घेतली.
ज्या ठिकाणी हे ड्रेनेज पाइपलाइनचे काम सुरू होते त्या ठिकाणी कलाश्री सोसायटीपासून 200 मीटर अंतरावर आतमध्ये हे काम सुरू होते. पावसामुळे या परिसरात चिखल झाला होता. त्यामुळे घटनास्थळावर जाण्यासही अडचण येत होती. या वेळी अग्निशन दलाने घटनास्थळावर तत्काळ धाव घेत तिघांना बाहेर काढून पुढील उपचारांसाठी पाठविले.
सायंकाळी सहाच्या सुमारास नकुल नावाच्या व्यक्तीने अग्निशमन दलाला कामगारांच्या अंगावर ढिगारा कोसळल्याची माहिती दिली होती. आमच्या दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. काही मिनिटांतच मदतकार्य सुरू केले. मातीच्या ढिगार्याखाली अडकलेल्या तिघांना तत्काळ बाहेर काढून उपचारांसाठी रुग्णालयात पाठविले. रात्री सव्वानऊच्या सुमारास उर्वरित एका कामगाराला बाहेर काढले. या वेळी उशिरा ढिगार्याबाहेर काढलेल्या कर्मचार्याचा मृत्यू झाला.- सुजित पाटील, अग्निशमन अधिकारी, पीएमआरडीए पुणे