कुरकुंभ: कुरकुंभ (ता. दौंड) घाटातील रस्त्यालगतच्या संरक्षक कठड्यांचे काम दीड महिन्यापासून अर्धवट अवस्थेत बंद आहे. या ठिकाणी अपघाताचा धोका कायम आहे. त्यामुळे तातडीने या कठड्यांचे काम पूर्ण करण्याची गरज आहे. दौंड तालुक्यातून मनमाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्ग गेला आहे.
यापैकी कुरकुंभ घाटातील रस्त्याचे काम 3 वर्षांपासून रखडले होते. त्यानंतर या कामाला मुहूर्त सापडला. घाटात रस्त्याचे वळण कमी करून काही भाग नवीन जागेतून वळविण्यात आला. येथील रस्त्यालगत दोन्ही बाजूंनी भिंती उभ्या करून त्यामध्ये मुरूम, दगड व मातीचा भराव टाकून तो खड्डा भरला गेला. भरावाची उंची जास्त झाली असून, दगडी भिंतीची लांबी, उंची अधिक झाली. त्यावरून सिमेंट काँक्रिटीकरणाचा रस्ता तयार केला. (Latest Pune News)
मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाले. काम सुरू असताना एका बाजूची भिंत कोसळली होती. सुदैवाने वाहतुकीस हा रस्ता खुला नसल्याने मोठा अनर्थ टळला. भिंत कोसळल्यानंतर दुसरा पर्याय वापरून भिंती तयार करण्याची गरज होती.
मात्र, तसे न करता पुन्हा त्याच पध्दतीने दगडी भिंती उभी करून रस्ता तयार केला असून, तो सध्या वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. रस्त्याची उंची कमी केली असली तरी अजूनही जड वाहनांना हा रस्ता पार करताना कसरत करावी लागते.
अनेक वाहने रस्त्याच्या मध्येच बंद पडतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी 50 ते 60 फुटांपर्यंत खोल भाग तयार झाला आहे. रस्ता वाहतुकीला खुला करण्यापूर्वी रस्त्यालगत दोन्ही बाजूंना संरक्षक कठड्यांचे काम पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही.
साधारणपणे दीड ते दोन महिन्यांपूर्वी हे काम सुरू केले होते. एका बाजूलाच कठडे बसविण्यात आले असून, दुसर्या बाजूला अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही, याकडे रस्ते विकास महामंडळाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
घाटात पथदिवे बसवावेत
महामार्गावरून दौंड, कुरकुंभ, बारामती, पुणे, सोलापूर, अहिल्यानगरकडे जाणार्या वाहनांची मोठी वर्दळ असते. कुरकुंभ एमआयडीसीतील कामगारांची देखील सतत ये-जा सुरू असते. रात्रीच्या सुमारास या ठिकाणी अंधार असतो. त्यामुळे वाहनचालकांना मारहाण करून लुटण्याचे प्रकार घडत आहेत. या घाटात पथदिव्यांची व्यवस्था करण्याची गरज आहे.