पुणे

महिला अत्याचार वाढले; गुन्हेगारांना जरब कधी बसणार ?

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोंढव्यात पायी जाणार्‍या तरुणीचा विनयभंग करण्यात आला. कात्रजमध्ये कॉलेज तरुणीला मारहाण करत भररस्त्यात गैरवर्तन करण्यात आले. कोथरूडमध्येही तरुणीचा विनयभंग करण्यात आला. तर वानवडीत लग्न झालेल्या महिलेवर बलात्कार करून 10 लाखांची फसवणूक करण्यात आली. शहरात महिलांवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, गुन्हेगारांना वेळीच जरब बसण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

पतीचे निधन झाल्यानंतर महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करून दहा लाख रुपये घेतले. त्यानंतर महिलेला ब्लॅकमेल करत शारीरिक संबंध ठेवले तरच पैसे परत करीन, असे सांगून वेळोवेळी अत्याचार केले. त्यानंतरही आरोपीने पैसे न दिल्याने, पीडित महिलेने आरोपीच्या मुलाला घडलेला प्रकार सांगितला असता त्यानेदेखील जिवे मारण्याची धमकी देऊन आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. वानवडी पोलिसांनी दोघा पिता-पुत्रावर गुन्हा दाखल केला. हा प्रकार 2022 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडला. 46 वर्षीय महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी हनुमंत लालू गोरगल (56) आणि प्रतिक हनुमंत गोरगल (दोघे राहणार. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे) या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल केला.

कोंढव्यात पायी जाणार्‍या तरुणीशी गैरवर्तन

रस्त्याने पायी जाणार्‍या तरुणीला अडवून गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. हा प्रकार मंगळवारी (दि. 20) रात्री आठच्या सुमारास महंमदवाडी येथील विबग्योर स्कूलसमोर घडला. याबाबत 20 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतलाल रामप्रसाद कुलदीप वर्मा (19, रा. कृष्णानगर, महंमदवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी मंगळवारी रात्री विबग्योर स्कूलसमोरील रस्त्यावरून पायी जात होती. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी थांबला होता. त्याने मुलीचे तोंड दाबून गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर करत आहेत.

कॉलेज तरुणीला मारहाण करून भररस्त्यात विनयभंग

भेटण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने कॉलेज तरुणीला भररस्त्यात कानशिलात लगावली. तसेच तिच्यासोबत गैरवर्तन करून विनयभंग केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी धनकवडीमधील तरुणावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 20) दुपारी तीनच्या सुमारास मॉडर्न कॉलेजजवळील फुटपाथवर घडला.याबाबत कात्रजमध्ये राहणार्‍या 19 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चेतन बाजीराव चव्हाण (वय 22, रा. समर्थ कॉम्पलेक्स, धनकवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मुलीने चेतन याला, 'तू मला फोन करू नकोस, तसेच मला भेटू नकोस,' असे सांगितले. मात्र, त्याने मुलीला वारंवार फोन करून बोलण्याचा प्रयत्न करून कॉलेज बाहेर येऊन 'मला तुझ्याशी बोलायचे आहे,' असे म्हणत तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी दुपारी तरुणी कॉलेजजवळ असलेल्या फुटपाथवर थांबली होती. त्या वेळी आरोपी त्या ठिकाणी आला. त्याने मुलीसोबत बोलण्याचा बहाणा करून जोरजोरात ओरडून म्हणाला, 'कोण आहेत ते तुझे मित्र, ते माझी बदनामी का करतात.' त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने सर्वांसमोर तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच, मुलीचा हात पकडून तिच्या कानशिलात लगावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT