Women Property Tax Discount Pudhari
पुणे

Women Property Tax Discount: महिलांना मिळकत करात ५० टक्के सवलत; ५०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मिळणार लाभ

राज्य शासनाच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिका हद्दीतील केवळ महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींना मिळकत करात ५० टक्के सवलत देण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठविण्यात येणार असून, शासनाची मान्यता मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे.

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात पाचशे चौरस फुटांपर्यंतचे जे घर महिलांच्या नावावर आहे, त्यांना मिळकत कर पन्नास टक्के सवलत देण्याची योजना मांडली होती.

स्थायी समितीच्या मंजुरीनंतर मंगळवारी मुख्य सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. शहरात महिलांच्या नावावर ७० हजार ७७३ निवासी मिळकती आहेत.

या मिळकतींकडून महापालिकेला दरवर्षी सुमारे ४०.४८ कोटी रुपये मिळकत कराच्या स्वरूपात प्राप्त होतात. प्रस्तावित करसवलतीमुळे महापालिकेच्या महसुलात अंदाजे २० कोटी रुपयांची घट होण्याची शक्यता आहे.

मात्र, महिलांच्या नावावर मालमत्ता नोंदणीला प्रोत्साहन मिळून महिला सक्षमीकरणाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केला.

...तर मिळणार कर सवलतीचा लाभ!

महिलांना कर सवलतीसाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. ३१ मार्च २०२५ रोजी महिलांच्या नावावर नोंद असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी मिळकतींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

ही सवलत केवळ आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील चालू मिळकत करापुरतीच लागू असेल. १ एप्रिल २०२६ पूर्वीची थकबाकी, त्यावरील व्याज, दंड अथवा शास्तीवर कोणतीही सूट मिळणार नाही.

तसेच अनधिकृत मिळकतींवरील दंडात्मक कारवाई आणि शास्तीच्या तरतुदी पूर्ववत राहणार आहेत. दरम्यान, सध्या ४० टक्के करसवलतीचा लाभ घेणाऱ्या मिळकतींना ५० टक्क्यांऐवजी २५ टक्के अतिरिक्त सवलत देण्याच्या प्रस्तावालाही सभेने मंजुरी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT