

पुणे: डेक्कन पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाला रात्रपाळी कर्तव्यावर असताना शिरोळे रोडवरील एका कॅफेत तोडफोड करणे चांगलेच भोवले आहे. संदीप कदम असे या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून, त्यांना पोलिस खात्यातून निलंबित केले आहे. याबाबतचे आदेश अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी दिले आहेत.
६ जून रोजी कदम हे रात्रपाळी कर्तव्यावर होते. रात्री पावणेदोन वाजता आस्थापना बंद करत असताना ते शिरोळे रोडवरील फ्लाईंग जिप्सी नावाच्या कॅफेत आले. त्यांनी आपल्या हातातील काठीने काउंटरवर असलेले कॉफीचे ग्लास व इतर खाद्य पदार्थ मारून खाली पाडले. तसेच, कॅफेत बसलेल्या ग्राहकांना त्यांच्या टेबलावरून उठून जाण्यास सांगितले.
कॅफेतील कर्मचाऱ्यांवर अरेरावीची भाषा केली. दरम्यान, हा सर्व प्रकार कॅफेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचे फुटेज समाजमाध्यमावर व्हायरल झाले. कदम यांच्या बेशिस्त व गैरवर्तनाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने शिस्तप्रिय पोलिस खात्याची प्रतिमा जनमानसात मलीन झाली.
कदम यांनी केलेले कृत्य हे बेजबाबदारपणाचे असून, पोलिस खात्यास अशोभनीय व खात्याच्या शिस्तीस बाधा निर्माण करणारे असल्याचा ठपका कदम यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील स्थायी व अस्थायी अस्थापना हॉटेल, रेस्टॉरंट ॲण्ड बार, पबच्या संदर्भात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावली केली आहे.
प्रत्येकाला त्यांच्या निर्धारित नियमानुसार वेळेची मर्यादा आखून दिली आहे. त्यांनी कोण-कोणती खबरदारी घ्यायची आहे, याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, रात्री या आस्थापना बंद करत असताना पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत.
एखादी आस्थापना जर नियमांचे उल्लंघन करत असेल, तर तिच्यावर कारवाई करत असताना, पोलिस अधिकारी आतमध्ये प्रवेश करणार नाहीत. ते मॅनेजरला बाहेर बोलावून घेतील व त्या आस्थापनेवर कारवाई करतील. असे असताना देखील पोलिस उपनिरीक्षक कदम यांनी कॅफेत प्रवेश करून ग्राहकांच्या समोरच काठीने कॅफेतील काऊंटरवरील खाद्यपदार्थ खाली पाडले. ग्राहकांना बाहेर हाकलले.