अपर्णा चव्हाण
आज आपण आधुनिक काळात वावरताेय. पुरुषांच्या बराेबरीने महिलांनाही करिअर घडवण्यास अनुकूल वातावरण आणि आवश्यक साधनसामग्री सहज उपलब्ध हाेत आहे. अशा स्थितीत सुशिक्षित समाजातील स्त्री आणि पुरुष एकमेकांच्या हातात हात घेऊन समाज समृद्ध करण्याऐवजी याच साधनांचा वापर गुन्हेगारीकरणासाठी हाेताना दिसत असून, गुन्हेगारीत महिलांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढत आहे. हे असे का होते, याचा विचार केल्यावर काही महत्त्वाच्या बाबींकडे माझे लक्ष वेधले गेले.
पूर्वीच्या काळात स्त्रीची प्रतिमा प्रेमळ, संयमी, लाजाळू, कुटुंबकेंद्री आणि भावनिकदृष्ट्या संवेदनशील अशी रंगवली जात असे. साहित्य, धर्म, संस्कृती आणि सामाजिक परंपरांमधूनही स्त्रीला त्याग, ममता आणि सहनशीलतेचे प्रतीक म्हणून मांडले गेले. तरीही अलीकडच्या काळात हिंसक गुन्हे, फसवणूक किंवा अगदी खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या काही घटनात महिलांचा लक्षणीय सहभाग असल्याचे समोर येत आहे. त्यामागच्या कारणमीमांसेचा विचार करता सामान्यत: पुढील बाबी समाेर येतात.
स्त्रिया अन् पुरुष दोघेही मानवी स्वभावाचे भागीदार
सर्वप्रथम आपण हे लक्षात घेणे क्रमप्राप्त आहे की, हिंसा, राग, मत्सर, सूडभावना, लोभ किंवा मानसिक असंतुलन हे गुण केवळ पुरुषांमध्येच नसतात. स्त्रियांमध्येही ते आढळू शकतात. पूर्वी अनेक स्त्रियांना सामाजिक बंधनांमुळे त्यांच्या भावना व्यक्त करण्याची किंवा कृतीत आणण्याची संधी तितकी मिळत नव्हती. आज त्यांचे सार्वजनिक जीवनातील अस्तित्व वाढल्याने त्यांचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही पैलू अधिक दिसू लागले आहेत.
मानसिक आरोग्याच्या समस्या
काही हिंसक गुन्ह्यांमागे तीव्र नैराश्य (Depression), व्यक्तिमत्त्व विकार (Personality Disorders), भावनिक अस्थिरता, सूडभावना, असुरक्षितता आणि त्यागाची भीती तसेच अतिरेकी मत्सर अशी अनेक मानसशास्त्रीय कारणेही असू शकतात. काही प्रकरणांत व्यक्ती दीर्घकाळ मानसिक ताणाखाली असते आणि निर्णयक्षमता कमी होते अशा वेळेस नेमके माणसाला काय करावे सूचत नाही. मात्र, मानसिक आजार असलेल्या बहुसंख्य व्यक्ती हिंसक नसतात, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे महिलांचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग याकडे पाहताना मानसशास्त्रीय कारणांचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
बदलत्या समाजाबरोबर नातेसंबंधांतील बदल
आधुनिक काळात प्रेमसंबंध, विवाह, घटस्फोट, सहजीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य याकडे पाहण्याचा दृष्टिकाेन यातही माेठे बदल हाेत असलेले दिसून येतात.
आजकालच्या पिढीमध्ये नवरा बायकोच्या नात्याकडून किंवा मित्र-मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी नात्यांकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या आहेत.
इतर जगाला दाखवण्यासाठी किंवा इतर नात्यांकडे सोशल मीडियावर बघून कम्पेअर केले जाते आणि त्यातून होणारे समज-गैरसमज वाढले आहेत. भावनिक गुंतवणूक अधिक तीव्र झाली आहे.
टीव्ही, साेशल मीडियातून खुनाच्या, फसवणुकीच्या, हाणामारीच्या घटना, बातम्या आपण नेहमीच पाहताे, त्याविषयी वाचताे. विशेषत: महिलेकडून हाेणाऱ्या अशा गुन्ह्यांच्या बातम्या वारंवार आपल्यापर्यंत पाेहाेचतात. मात्र, लग्न ठरलेय पण ते करायचं नाही, म्हणून तरुणीने प्रियकराच्या मदतीने हाेणाऱ्या नवऱ्यालाच यमसदनी धाडले. ही घटना गुन्हेगारीत महिलांचे वाढत चाललेले प्रमाण याकडे एक मानसशास्त्रज्ञ म्हणून विचार करण्यास भाग पाडणारी ठरली आहे.