पुणे

Lok sabha Election 2024 Results : पोलिस व्हॅनच्या धडकेत महिला जखमी; चालक पोलिसाची होणार वैद्यकीय तपासणी

Sanket Limkar

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पोलिस वाहनाने महिलेसह एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तसेच, एका दुचाकीचेही नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवार (दि. ४) दुपारी अडीचच्या सुमारास बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील पोलिस चौकीसमोर घडली.

नागेश भालेराव (नियुक्ती, हिंजवडी पोलिस ठाणे), असे चालक पोलिस अंमलदाराचे नाव आहे. या अपघात शंकुतला पंडित शेळके (रा. महाळुंगे) या जखमी झाल्या असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणी मंगळवारी (दि.४) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडली. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पिंपरी- चिंचवड पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्त सुरु असताना ड्युटीवरील अंमलदार नागेश भालेराव शासकीय वाहनात बसले होते. त्यावेळी वाहनाचे इंजिन सुरु होते.

दरम्यान, भालेराव यांचा पाय वेग वाढवण्याच्या पेडलवर (ऍक्सीलेटर) पडला. त्यामुळे वाहनाने समोरून पायी जाणाऱ्या शकुंतला यांच्यासह उभ्या दुचाकींना धडक दिली. यामध्ये शकुंतला यांना गंभीर दुखापत झाली. तसेच, एका तरुणाच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. अचानक झालेल्या आवाजामुळे माध्यमांच्या प्रतिनिधींसह पादचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

माध्यमांच्या प्रतिनिधींनी भालेराव यांना जखमी महिलेला तत्काळ रुग्णालयात घेऊन जाण्याबाबत सुचवले. त्यावेळी उपस्थित पोलिसांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच, रुग्णवाहिका आल्यानंतर महिलेला घेऊन जाऊ, असे बोलून एका पोलिसाने अरेरावी केली. माध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केल्यानंतर एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी आलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शकुंतला यांना पोलीस वाहनातून रुग्णालयात नेत वातावरण शांत केले. शकुंतला यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.

पोलिस अंमलदार नागेश भालेराव यांच्या ताब्यात असलेल्या वाहनाने महिलेसह एका दुचाकीला धडक दिली आहे. यामध्ये महिला जखमी झाली आहे. भालेराव यांची वैद्यकीय चाचणी करण्याचे काम सुरु आहे. चौकशीअंती भालेराव यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

– कन्हैया थोरात, वरिष्ठ निरीक्षक, हिंजवडी पोलिस ठाणे

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT