पुणे: व्याजाने घेतलेल्या पैशापैकी निम्म्याहून अधिक पैसे परत केल्यानंतर देखील एका महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढेच नाही तर आत्ताच्या आता पैसे परत करत, जर पैसे दिले नाही तर तृतीयपंथी आणून बसवतो, असे धमकावून पार्लरमधील शिलाई मशीन उचलून नेण्यात आली आहे.
याप्रकरणी 37 वर्षांच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी महेश खडके नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. फिर्यादी व आरोपी ओळखीचे आहेत. फिर्यादी यांनी महेश खडके याच्याकडून 30 हजार रुपये घेतले होते. (Latest Pune News)
त्यापैकी 21 हजार रुपये परत केले होते. असे असताना 15 दिवसांपूर्वी महेश खडके हा पार्लरवर आला. फिर्यादीला व्याजासह आत्ताच्या आता 30 हजार रुपये दे, असे बोलून शिवीगाळ केली. पार्लरवर तृतीयपंथी आणून बसवतो व घरात सुद्धा येऊन बसतो, अशी धमकी दिली. त्यानंतर पार्लरमध्ये ठेवलेली शिलाई मशीन उचलून घेऊन गेला.
त्यानंतरही शिलाई मशीन परत न केल्याने 15 दिवसांनी या महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी स्त्रीयांचा अपमान करणे, विनयभंगाच्या उद्देशाने बळाचा वापर करणे, धमकी देणे, अशा भारतीय न्याय संहितेच्या 79, 74, 351 (1) या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र, व्याजाने पैसे दिले असतानाही सावकारी विरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल केल्याचे दिसून आला नाही. पोलिस उपनिरीक्षक निकम तपास करत आहेत.