पिंपरी(पुणे) : भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरून जाणार्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी (दि. 20) रात्री साडेदहाच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथे हा अपघात झाला. छत्राराम रामजी चौधरी (45, रा. रावेत), आछलाराम दर्गाजी चौधरी (50, रा. चिंचवडगाव) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. ट्रक चालक रामेश्वर तुळशीराम जाधव (23, रा. शिंदेगाव, जि. नाशिक, मूळगाव कारली, जि. वाशीम) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी संदीप शेळके यांनी गुरुवारी (दि. 21) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
आछलाराम हे एलआयसी एजंट होते. तर, छत्राराम हे सौंदर्य प्रसाधनांचे ठोक विक्रेते होते. दरम्यान, बुधवारी रात्री दोघेही एका दुचाकीवरून पुणे येथून चिंचवड स्टेशनच्या दिशेने जात होते. त्या वेळी आरोपीचालक रामेश्वर जाधव याच्या ताब्यातील ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोघेही दुचाकीवरून खाली पडले. नंतर ट्रकचे चाक दोघांच्या डोक्यावरून जाऊन ते चिरडले गेले. अपघाताबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आछलाराम आणि छत्राराम या दोघांनाही वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. याबाबत माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली. तसेच, काही वेळाने अपघातग्रस्त वाहने पोलिस ठाण्यात आणून लावली. दरम्यान, गुरुवारी (दि. 21) सकाळी ठाण्यात आलेल्या नातेवाइकांनी मृतांच्या गाडीच्या डिक्कीत दहा लाखांची रोकड असल्याचे सांगितले. पोलिसांनीदेखील लगबगीने गाडीची डिकी उघडून पाहिली. त्या वेळी त्यांना रोकड मिळून आली. त्यानंतर पोलिसांनी रोकड संबंधित नातेवाइकांच्या स्वाधीन केली.
ट्रकने धडक दिल्यानंतर दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. तसेच, रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याने रस्ता धुतला.
हेही वाचा