पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या हडपसर टर्मिनलच्या कामासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात पुरेसा निधी मिळाल्यामुळे कामाला आता वेग येणार आहे. तब्बल 21 कोटी रुपये हडपसर टर्मिनलच्या विकासकामासाठी मिळाले आहेत. पुणे स्टेशन प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी 31 कोटी, तर हडपसर टर्मिनलच्या विकासासाठी 21 कोटी, असा एकूण 52 कोटींचा निधी पुणे रेल्वे प्रशासनाला नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मिळाला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेची सर्व कामे रेल्वे प्रशासनाकडून वर्षभरात पूर्ण होणार आहेत.
याव्यतिरिक्त पुणे-मिरज-लोंढा येथील मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 1567 कोटींचा निधीसुध्दा रेल्वे प्रशासनाला मिळाला आहे.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या बजेटमध्ये यंदा रेल्वेच्या पुणे विभागाला भरघोस निधी मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिळालेला निधी अधिक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदा रेल्वेच्या रखडलेल्या कामांना वेग येणार असल्याचे दिसत आहे.
तसेच, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड कॉरिडॉरसाठी 1 हजार रुपये 'हेड टोकन' देण्यात आले आहे. राज्य शासनाने कामाला हिरवा कंदील दाखविल्यानंतर उर्वरित निधी मिळणार आहे.
हडपसर टर्मिनलचा विकास होण्यासाठी रेल्वे प्रशासनाला एकूण 35 कोटींची आवश्यकता होती. यापूर्वीसुद्धा रेल्वेला निधी मिळाला होता. आता मिळालेल्या 21 कोटींच्या निधीमुळे हडपसर टर्मिनलच्या विकासासाठी एकूण 41 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे हडपसर टर्मिनलचा विकास निधीअभावी आता रखडणार नाही. तसेच, या निधीच्या माध्यमातून येथे दोन स्टेबलिंग लाइन, पॅसेंजर अॅमेनिटी, स्थानकावरील छत टाकण्याचे काम, टर्मिनलच्या बाहेरील परिसराचे विकसन, यांसह अनेक कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
पुणे रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2/3/6 च्या विस्तारीकरणाचे काम रेल्वे प्रशासनाकडून या मिळालेल्या निधीमुळे हाती घेतले जाणार आहे. यांसह येथील विविध तांत्रिक कामेसुद्धा रेल्वे प्रशासन या स्थानकावर करणार असून, यार्डाची दुरुस्तीसुद्धा करण्याची शक्यता आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये बारामती-लोणंदच्या कामाला निधीच मिळालेला नाही. या मार्गावर रेल्वे प्रशासनाने नवे मार्ग टाकण्याचे काम हाती घेतले होते. यात फलटण ते बारामती एक मार्ग टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, बारामती ते फलटण दुसरा मार्ग टाकण्याचे काम रखडले आहे. भूसंपादनाचे काम सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पुणे-मिरज-लोंढा या मार्गावर रेल्वेकडून दुहेरीकरणाच्या कामासाठी नुकतेच 1567 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरील कामांना आता वेग येणार आहे. रेल्वे प्रशासनाने पुणे ते मिरज विभागात आतापर्यंत 80 किलोमीटरचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण केले असून, उर्वरित 199 किमीचे काम पूर्ण करायचे आहे. हे काम आता वेगाने होणार आहे. पुणे-मिरज-लोंढादरम्यान एकूण 279 किलोमीटरचे दुहेरीकरणाचे काम होणार आहे. यात पुणे ते शिंदवणे, आमले ते राजेवाडी, दौंड ते वाल्हे, शेणोली ते भवानीनगर, भवानीनगर ते ताकारी, ताकारी ते किर्लोस्करवाडी या विभागांची कामे पूर्ण झाली आहेत.