जळोची(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पावसाळा सुरू झाल्यापासून आळंदी (ता. खेड) परिसरातील 2 हजारांहून अधिक जणांना डोळ्यांचा दाह अथवा डोळे येण्याचा प्रादुर्भाव झाला होता. त्या पाठोपाठ पुणे जिल्ह्यातदेखील असे अनेक रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे डोळे येण्याच्या साथीची शक्यता नेत्ररोग तज्ज्ञांनी वर्तवली आहे. डोळ्यांच्या दाह अथवा डोळे येणे हे डोळ्यांचा संसर्ग आहे. ज्यामुळे प्रभावित डोळ्यांमध्ये अस्वस्थता, लालसरपणा आणि खाज येऊ शकते. या संसर्गाचे स्वरूप समजून घेणे आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह व्हायरस, बॅक्टेरिया, अॅलर्जी यांसह विविध कारणांमुळे होऊ शकतो. हा आजार अत्यंत सांसर्गिक आहे आणि संक्रमित व्यक्तींशी थेट संपर्क साधून किंवा विषाणूने दूषित पृष्ठभागांना स्पर्श केल्याने सहज पसरू शकतो.
प्रमुख लक्षणे :
1. डोळ्यांच्या पांढर्या भागात किंवा पापणीच्या आतील भागात लालसरपणा.
2. डोळ्यांना खाज सुटणे किंवा टोचल्याची भावना.
3. डोळ्यांमधून पाणी येणे.
4. डोळ्यांभोवती सूज येणे.
प्रतिबंधात्मक उपाय :
1. हात साबणाने आणि पाण्याने वारंवार धुवा.
2. डोळ्यांना स्पर्श करणे टाळा.
3. वापरलेले टिश्यू योग्यरीत्या टाकून द्या आणि टॉवेल, डोळ्यांचा मेकअप किंवा कॉन्टॅक्ट लेन्स यांसारख्या वैयक्तिक वस्तू सामायिक वापर करणे टाळा.
4. कॉन्टॅक्ट लेन्स घातल्यास, योग्य स्वच्छतेचे पालन करा आणि तुमच्या डॉक्टरांच्या शिफारसीनुसार परिधान करा आणि बदला.
5. संसर्ग झाल्यास घरी राहा. लहान मुलांना डोळे आल्यास त्यांना शाळेत पाठवू नये.
या आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास किंवा शंका असल्यास, त्वरित जवळच्या नेत्ररोगतज्ज्ञांना भेटावे. लवकर निदान आणि योग्य वेळेत उपचार केल्यास लक्षणे लवकर कमी करण्यास आणि पुढील गुंतागुंत टाळण्यास मदत होते. मेडिकलमधून विकत घेतलेल्या औषधाने स्वत: उपचार करू नयेत.
हेही वाचा