पुणे

स्वतंत्र आयुष मंत्रालयासाठी प्रयत्न करणार : मुश्रीफ

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  केंद्राच्या धर्तीवर राज्यात स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. आयुर्वेद शिक्षकांसाठी सातवा वेतन आयोग लागू करावा, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. आयुर्वेद टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान, नाशिक यांच्यातर्फे शिवदर्शन येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला शिक्षक आमदार जयंत आसगावकर, संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल सूर्यवंशी, उपाध्यक्ष डॉ. नितीन चांदुरकर, बडोदा पारुल विद्यापीठाचे आयुर्वेद विभाग अधिष्ठाता डॉ. हेमंत तोशीखाने आदी उपस्थित होते. डॉ. गोविंद उपाध्याय आणि डॉ. भालचंद्र भागवत यांना 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हसन मुश्रीफ म्हणाले, 'राज्यामध्ये सहा शासकीय आयुर्वेद महाविद्यालये आणि 16 अनुदानित महाविद्यालयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापकांची पदे रिक्त होती. शासकीय महाविद्यालयांमधील 90 टक्के पदे एमपीएससीच्या माध्यमातूनही भरण्यात आली आहेत. अनुदानित महाविद्यालयांमध्ये पदे भरण्यासंदर्भातील प्रश्न हा न्यायालयांमध्ये प्रलंबित आहे. प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करणार आहे.' जयंत आसगावकर म्हणाले, 'कोरोना काळामध्ये आयुर्वेदाचे महत्त्व सर्व जगाला कळले आहे. पूर्णतः आयुर्वेदाला वाहून घेणारी तरुण पिढी निर्माण केली पाहिजे. आयुर्वेदाचा विविध माध्यमांतून प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे.'

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT