एकनाथ लोमटे महाराज यांना अटक

पंढरपूर ः पुढारी वृत्तसेवा मलकापूर (ता. कळंब) येथील तथाकथित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराज यांना पंढरपूर येथे येरमाळा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाच्या आदेशाने ही कारवाई झाल्याचे सांगण्यात आले. 28 जुलै 2022 रोजी परळी येथील महिला भाविकाचा विनयभंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. येरमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर लोमटे महाराज फरारी झाले होते. न्यायालयाने जामिन मंजूर केल्यानंतर पीडित महिलेने पुन्हा न्यायालयात दाद मागितली होती.
काय आहे प्रकरण?
कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांच्यावर येरमाळा पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्या विरोधात यापूर्वी भोंदूगिरीवरूनही गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते राजकीय क्षेत्रात उठबस असणारे प्रसिद्ध महाराज आहेत. पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरारी झाले होते. परळी येथील पीडित महिला त्यांच्याकडे नियमित दर्शनासाठी येत होती. 28 जुलै 2022 रोजी ती लोमटे महाराज यांच्या मठामध्ये आली. दुपारनंतर महाराजांनी तिला एका खोलीत बोलवून शरीरसुखाची मागणी केली. तिने नकार देताच तुझ्याबरोबरचे शरीर संबंधाचे व्हिडीओ माझ्याकडे असल्याची धमकी महाराजांनी दिली आणि विनयभंग केला. आरडाओरडा करत आपण त्या ठिकाणाहून पळून गेल्याची फिर्याद पीडित महिलेने पोलिसांत दिली होती.