पुणे

दौंड पंचायत समितीतील सावळागोंधळ चव्हाट्यावर येणार?

Laxman Dhenge

यवत : पुढारी वृत्तसेवा : कार्यकाळ पूर्ण झालेल्या वर्ग 3 व 4 दर्जातील कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार असल्याचा सूर दौंड पंचायत समितीतील कर्मचार्‍यांच्या कानापर्यंत पोहोचताच कार्यालयात नाराजीचा सूर उमटला आहे. दौंड पंचायत समितीत दै. 'पुढारी'च्या बातम्यांनी कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी जोरदार कामाला लागले आहेत. येथील कर्मचारी व अधिकारी यांनी आर्थिक तडजोडी करून अनेक प्रकरणे मंजूर केली आहेत अशी चर्चा आहे. या कामांना ग्रामपंचायतीचे ठराव नाहीत, लेबर बजेट उपलब्ध नाहीत, जातीचे दाखले उपलब्ध नाहीत, अल्पभूधारक दाखले उपलब्ध नाहीत, ग्रामपंचायत मागणी पत्र नाहीत तरीदेखील वैयक्तिक लाभार्थ्यांकडून आर्थिक तडजोडी करून थेट योजनांचा लाभ देत आपली पोळी भाजून घेणारे अधिकारी दै. 'पुढारी'च्या बातमीने कागदपत्र जुळवणीच्या कामाला लागले आहेत.

पुणे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने वर्ग 3 व वर्ग 4 मध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांची आपसी बदली व विनंती बदलीबाबतची माहिती मागवली असल्याने या कर्मचार्‍यांच्या बदल्या अटळ आहेत; मात्र या बदल्या तातडीने होणे गरजेचे आहे. या कर्मचार्‍यांनी कागदपत्रे बदलली तर झालेले सर्व घोटाळे येथेच विरून जातील. त्यामुळे याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी काम करणार्‍यांना तत्काळ बदली करून तेथील गैरव्यवहार बाहेर काढणे गरजेचे आहे.

दौंड पंचायत समितीत दिवसेंदिवस भ्रष्टाचार वाढत चालला असून, याला प्रशासनातीलच अधिकारी खतपाणी घालत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शेतकर्‍यांकडून विविध योजनांसाठी लाखो रुपयांची आर्थिक वसुली येथील अधिकारी व कर्मचारी संगनमताने करत असून, 'दाम दिले तरच शेतकर्‍याचे काम' अशी अवस्था येथील कार्यालयातील प्रत्येक विभागात निर्माण झाली आहे. यावर वरिष्ठांनी विशेष लक्ष देण्याची गरज असून, शेतकर्‍यांची पिळवणूक करणार्‍या कर्मचारी व अधिकारी यांना लगाम घालण्याचे गरजेचे आहे.

एक लिपिक अनेक वर्षे खुर्चीला चिकटून

दौंड पंचायत समितीतील एका विभागात एक लिपिक अनेक वर्षे खुर्चीला चिकटून बसला असून, त्यांनी आतापर्यंत शेतकर्‍यांना वैयक्तिक लाभाच्या योजना देताना शेतकर्‍यांकडून लाखो रुपये वसूल केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येथील या विभागाची कक्षाची चौकशी होणे गरजेचे आहे, असे एका शेतकर्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. याबाबत वरिष्ठ काही निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

भ्रष्ट कर्मचार्‍यांवर कारवाईची गरज

वरिष्ठ आमच्या खिशात आहेत, वरिष्ठ आमच्या इशार्‍यावरच काम करतात. आमचे लागेबांधे वरपर्यंत आहेत, आमचं कोणी काही करू शकत नाही अशा आविर्भावात मिरवणार्‍यांची प्रशासनाने तातडीने बदली करून त्या कक्षांची चौकशी करून गैरव्यवहार बाहेर काढून कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT