पुणे

मावळ लोकसभा मतदारसंघात वातावरण तापले : संजोग वाघेरे शिवसेनेत

Laxman Dhenge

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा ताब्यात राहिला आहे. मावळात पुन्हा भगवा फडकविण्यासाठी शिवसेनेचे (ठाकरे गट) राष्ट्रवादी काँग्रेसचे संजोग वाघेरे यांना मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन हिवाळ्यात वाघेरेंच्या एन्ट्रीमुळे मावळचा रणसंग्राम चांगलाच तापणार आहे. शिवसेना मावळचा गड राखणार का, याविषयीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

काँग्रेसमधून आलेले श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे दोन वेळा खासदार झाले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर बारणे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, मावळ मतदारसंघातील शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते उद्धव ठाकरेंसोबतच कायम असल्याचे चित्र आहे. महाआघाडीत मावळ मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी घड्याळाची साथ सोडत, हातावर शिवबंधन बांधले. त्यामुळे मावळ मतदारसंघातील राजकीय समीकरणे फिरली आहेत.

पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण व पनवेल अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा मावळात समावेश आहे. चिंचवड हा राज्यातील मोठ्या मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा निवडणुकीवर आगामी विधानसभेची गणिते ठरणार आहेत. त्यामुळे मावळ आपल्या ताब्यात राखण्यासाठी सर्वच पक्षांची धडपड सुरू आहे. त्यासाठी वेगवेगळ्या रणनितीचा अवलंब केला जात आहे. मावळ आपल्याकडेच राहणार असा दावा महायुती आणि महाविकास आघाडीकडून केला जात आहे.

विजयासाठी ठाकरे गट आक्रमक

शिंदे गटाची वाट धरल्याने खा. श्रीरंग बारणे यांच्यावर शिवसैनिक राग धरून आहेत. त्यांचा पराभव करण्याची रणनिती शिवसेनेने आखली आहे. संजोग वाघेरे यांना उभे करून मावळ्यात विजय साकारण्याचा निश्चय पक्षाने केला आहे. ठाकरे गट आक्रमक भूमिकेत आहे. त्यासाठी नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते किती कसब पणाला लावतात, यावर विजयाचे चित्र ठरणार आहे.

अजित पवार गटाला संघटन मजबूत करण्याची गरज

मागील निवडणुकीत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव झाला. यंदाच्या निवडणुकीत महायुतीमध्ये राष्ट्रवादीला आपली वेगळी ताकद दाखवावी लागणार आहे. संजोग वाघेरेंच्या जाण्याने पक्षाची ताकद कमी झालेले नाही, हे सिद्ध करावे लागणार आहे. संघटन मजबूत ठेऊन पक्ष वाढीसाठी झुंजावे लागणार आहे. त्यासाठी पक्षाचा कस लागणार आहे. या निवडणुकीवरून विधानसभेचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, पार्थ पवार यांचा पराभव करणारे श्रीरंग बारणे यांचे काम कसे करायचे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महायुतीच्या उमेदवाराला की पूर्वी सहकारी असलेल्या वाघेरे यांना साथ मिळणार, हे पाहणे औत्सुकाचे ठरणार आहे. तुर्त कार्यकर्ते काहीसे
संभ्रमात आहेत.

श्रीरंग बारणे यांना गाफील राहून चालणार नाही

विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहेत. महायुतीत आपल्याचा तिकीट मिळेल, असा त्यांचा दावा आहे. पाच वर्षातील कामांमुळे मतदार आपल्याला पुन्हा संधी देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा, भाजप तसेच, अजित पवार यांची राष्ट्रवादीसोबत असल्याने विजय आपलाच होणार असा विश्वास ते व्यक्त करीत आहेत. मात्र, मावळ मतदारसंघात शिवसेनेला मानणारा वर्ग मोठा असून, मोंठ्या संख्येने पदाधिकारीही उद्धव ठाकरे गटासोबत आहेत. बारणेंच्या कार्यपद्धतीवर भाजप व राष्ट्रवादीमध्ये रूववे- फुगवे आहेत. या परिस्थितीत बारणे यांना गाफील न राहता आपली जागा राखण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे, असे जाणकारांचे मत आहे.

भाजपमध्येही इच्छुकांची संख्या वाढतेय

मावळ मतदारसंघावर भाजपनेही दावा केला आहे. भाजपकडून अनेक जण इच्छुक आहेत. पक्षाकडून मतदारसंघात सूक्ष्म पातळीवर काम केले जात आहे. वर्षभर विविध कार्यक्रम राबवून पक्ष संघटन सक्रिय ठेवण्यात पक्षाला यश आले आहे. अनेक महापालिका व नगरपालिका भाजपच्या ताब्यात असल्याने तसेच, नुकत्याच झालेल्या इतर राज्यातील निवडणुकीतील विजयामुळे भाजपकडून अनेक जण रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. महायुतीत जो उमेदवार देणार त्याचे काम केले जाईल, असा दावा केला जात असला तरी, इच्छुकांची संख्या फुगत आहे. इच्छुकांना सांभाळत, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादीसोबत (अजित पवार गट) काम करताना भाजपला बरीच कसरत करावी लागेल, असे चित्र आहे.

वाघेरे यांच्यासमोर आव्हान

संजोग वाघेरे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दिवंगत महापौर भिकनशेठ वाघेरे-पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या कुटुंबाला राजकीय वारसा आहे. संजोग वाघेरे हे पिंपरीगावातून नगरसेवक म्हणून निवडून आले. ते महापौरही झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक निवडणुक लढल्या गेल्या आहेत. त्यांना बराच राजकीय अनुभव आहे. त्यांच्या पत्नी उषा वाघेरे या माजी नगरसेविका आहेत. संयमी असलेले वाघेरे यांचे विरोधकांशीही स्नेहाचे संबंध आहेत. राष्ट्रवादीसह भाजपमध्येही त्याचे चांगले नाते आहे. त्या मैत्रीचा त्यांना कितपत फायदा होतो, नात्यागोत्यांच्या पाठींबा मिळविण्यात ते यशस्वी होतात का, हे पाहावे लागेल. पिंपरी-चिंचवडसह रायगड जिल्ह्यातील तीन मतदासंघात त्यांना पोहचावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेससोबत असले तरी, शिवसेनेने उमेदवार लादला ही भावना पुसण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT