पुढारी ऑनलाईन डेस्क : पवार कुटुंबातील सर्व वाद मिटून पवार कुटुंब एकत्रित यावे व गुण्यागोविंदाने नांदावे. नववर्ष सर्वांना सुख-समृद्धीचे जाऊ दे. अजित पवार आणि शरद पवार एकत्रित येऊ देत, असे साकडे आपण विठ्ठल चरणी घातले आहे. श्री विठ्ठल माझे गार्हाने नक्कीच ऐकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनानंतर व्यक्त केला होता. यानंतर आता मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी याबाबत सुचक विधान केले आहे. (Sharad Pawar on Ajit Pawar)
दोन्ही पवार घराण्यांनी एकत्र यावे, ही महाराष्ट्राची इच्छा आहे. शंभर टक्के या दोन्ही घराण्यांनी एकत्र आले पाहिजे, ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. पवार घराणे म्हणून आपल्या सर्वांचं दैवत आहे. या दोघांनी एकत्र येण्यातच सर्वांना आनंद आहे, असे भरणे यांनी इंदापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) एकत्र येतील अशा चर्चा असताना राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी नववर्षानिमित्त बुधवारी (दि. 1) सकाळी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विठ्ठलाच्या दानपेटीत दानही टाकले. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधाला.आशाताई पवार म्हणाल्या, मी पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन साकडे घातले आहे की, माझ्या अजितला आणि सर्वांनाच चांगले, सुखी ठेव. त्यांच्या मागे असलेली संकटे दूर कर. अजित पवार आणि शरद पवार यांना एकत्रित येवू दे, असे पांडूरंग चरणी साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले.