पुणे

पुणे : कुपोषणमुक्तीसाठी हवी व्यापक जनजागृती

अमृता चौगुले

नरेंद्र साठे

पुणे : सध्या पुणे जिल्ह्यात कुपोषणमुक्त अभियान दरवर्षीप्रमाणे जोमात सुरू आहे. दरवर्षी पुणे जिल्हा कुपोषणमुक्तीचा संकल्प केला जातो. मात्र, त्याला यश येत नाही. कुपोषणाचे प्रमुख एक कारण म्हणजे बालकांचा आहार, योग्य आहार आणि तो कसा उपलब्ध होईल, याबाबत तसेच शिक्षणाबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. तसेच प्रशासनासोबत काही स्वयंसेवी संस्थांचीदेखील कुपोषणमुक्त अभियानासाठी साथ मिळणे गरजेचे आहे.

कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने गेल्या काही वर्षांत विविध उपाययोजना केल्या आहेत. पूरक पोषण आहार देणे आणि वेळीच आवश्यक आरोग्यसेवा पुरविणे या दोन्ही महत्त्वाच्या बाबी आहेत. किंबहुना पूरक पोषण आणि आरोग्यसेवा, या दोन्ही एकत्रितपणे आणि समन्वयाने पुरविण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील तसेच अतिदुर्गम आदिवासी भागातील रुढी-परंपरा, अंधश्रद्धा तसेच कमी वयात होणारे लग्न व दोन अपत्यांमधील कमी अंतर, आरोग्याबाबत प्रचंड दुर्लक्ष ही प्रमुख तसेच इतरदेखील कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. तसेच बालकांच्या आहाराविषयी पालकांमध्ये असलेले अज्ञान हे कुपोषणामागील प्रमुख कारण असल्याचे दिसून येते.

काय करणे गरजेचे..?

बाळाच्या जन्मानंतर एका तासाच्या आत मातेचे दूध पाजणे, जन्माच्या सहा महिन्यांपर्यंत फक्त मातेचेच दूध पाजणे यावर भर दिला गेला पाहिजे. सहा महिने झाल्यानंतर मातेच्या दुधासोबत पूरक आहार सुरू करणे गरजेचे आहे. पोषण आहारामध्ये सर्व मुख्य व सूक्ष्म तत्त्वे उपलब्ध असणारे पोषण आहार दररोज तीन ते आठ वेळा देणे, रक्तातील लोहाचे प्रमाण वाढविण्यासाठी ओषध देणे, मुलाची वयाची नऊ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दर सहा महिन्यांनी जीवनसत्त्व 'अ' देणे, आयोडिनयुक्त मिठाचे नियमित सेवन करणे, मातांना व बाळाला लसीकरण आणि घरातील वातावरण स्वच्छ ठेवून बाळाच्या विष्ठेची योग्य विल्हेवाट लावणे, बाळाला उकळलेले पाणी पाजणे, यावर विशेष भर दिला गेला पाहिजे. याशिवाय गावपातळीवर माता बैठका, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन व प्रभात फेरी तसेच ग्रामसभा घेऊन मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे.

जिल्ह्यात सुरू आहेत ग्राम बालविकास केंद्रे

कुपोषित बालकांसाठी जिल्हा परिषदेकडून ग्राम बालविकास केंद्रे (व्हीसीडीसी) विविध अंगणवाड्यांमध्ये सुरू केली आहेत. त्यांच्या माध्यमातून कुपोषित बालकांसाठी चौरस आहार देण्यात येत आहे. ग्राम बालविकास केंद्रामध्ये देण्यात येणार्‍या आहारामध्ये नाचणी खीर, गहूसत्त्व खीर, कोथिंबीर मुठीया, मेथी मुठीया, मसाला इडली, थालीपीठ, केळी, मुरमुरा लाडू इत्यादी पदार्थांचा समावेश आहे.

कुपोषणमुक्तीसाठी आम्ही जुन्नर भागात जिल्हा परिषदेसोबत काम करीत आहोत. कुपोषण कमी करण्यासाठी अगोदर ग्रामीण भागातील गरिबी कमी होणे गरजेचे आहे. याशिवाय शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे, तसेच प्रशासनासोबत काही एनजीओ, सीएसआर फंड देणार्‍या संस्थांनी एकत्र येऊन या कुपोषणमुक्तीसाठी योगदान देणे गरजेचे आहे.

सचिन कुलकर्णी, समन्वयक,
मुकुल माधव फाउंडेशन

जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. जिल्ह्यातील प्रत्येक मुलाची आरोग्य तपासणी केली. सध्या आढळून आलेल्या कुपोषित बालकांवर व्हीसीडीसीमध्ये ठेवण्यात आले आहे. कुपोषणमुक्तीसाठी आम्ही जनजागृती करीत आहोत. गेल्या वर्षी व्हीसीडीसी केंद्रे सुरू केली होती, त्याचा फायदा झाल्याने या वर्षी कुपोषित बालकांची संख्या घटली आहे.

जामसिंग गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जि. प.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT