कात्रज : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाबाबत महापालिका प्रशासन वारंवार भूमिका बदलत असल्याने या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे रुंदीकरणाच्या मूळ उद्देशाला खीळ बसत असून, जागामालक व नागरिकांमध्ये संभ—माचे वातावरण निर्माण झाले आहे. नित्याची वाहतूक कोंडी व अपघातांच्या मालिकेने हैराण झालेल्या नागरिकांनी वेगवेगळे प्रयोग करायला हा रस्ता काय प्रयोगशाळा आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्यावर साडेतीन किलोमीटर अंतरावर 84 मीटर रुंदीकरणास ऑक्टोबर 2018 मध्ये सुरुवात झाली. भूसंपादनासाठी अधिक निधी लागत असल्याने या रस्त्याची रुंदी 84 वरून 50 मीटर करण्यात आली. राज्य सरकारकडे 200 कोटीच्या निधीची मागणी केली. त्यानंतरदेखील भूसंपदानाच्या कामाला गती आली नाही. महापालिका प्रशासनाने हे अपयश झाकण्यासाठी अरुंद रस्ता व दाट लोकवस्तीतून थेट उड्डाणपूल बांधण्याचा मनसुबा आखला आहे.
गेल्या पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्णत्वास येणे अपेक्षित होते. मात्र, आतापर्यंत केवळ 35 टक्के काम झाले आहे. या रस्त्यावरील जड वाहतुकीने नित्याची वाहतूक कोंडी होत असून, अपघातांतील निष्पापांच्या बळीचा आकडा नव्वदीकडे गेला आहे. अशी गंभीर परिस्थिती असताना प्रशासन रुंदीकरणाबाबत ठोस निर्णय न घेता वारंवार भूमिका बदलत आहे. पालकमंत्री एक गेले, दुसरे आले. आयुक्तांसोबत पाहणी दौरे झाले. तरी भूसंपादन व रुंदीकरण प्रगती शून्यच आहे.
विद्यमान आमदार, खासदार यांचेही विशेष लक्ष नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. या रस्त्याचे रुंदीकरण होण्याऐवजी घोषणांमध्ये अडकणार का ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. रस्त्यावर खड्डे, साईड पट्ट्या व दुभाजकांची दुरवस्था, वारंवार जलवाहिनी फुटणे, दुभाजकाला कमी पंचर असल्याने वळसा घेऊन यावे लागते, आदी समस्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. अनेक दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वंडरसिटी ते माऊली नगरपर्यंत उड्डाणपुलाचे काम आहे. हा उड्डाणपूल 900 मीटर वाढवून शिवशंभोनगरपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव महापालिका प्राधिकरणाला देणार आहे. मात्र, यासाठीदेखील 50 मीटर रस्त्याचे भूसंपादन करावेच लागेल. पर्यायी रस्त्याची व्यवस्था नसल्याने उड्डाणपुलाचे काम कसे करणार, आराखड्यातील पूर्वीच्या 84 मीटर पुन्हा 50 मीटरसाठी भूसंपादन झाले त्यांचे काय, असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत.
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महापालिकेने 72 ब प्रस्ताव मंजूर करत रुंदीकरणाची जबाबदारी स्वीकारली. निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू झाले, याचा विसर प्रशासनाला पडला आहे. भूसंपादना-अभावी रस्तारुंदीकरण रखडणे हे आयुक्तांचे अपयश आहे. 13 मार्च 2022 पासून प्रशासक म्हणून भूमिका बजावणारे आयुक्त विक्रम कुमार या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत वारंवार भूमिका बदलत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नित्याची वाहतूक कोंडी व अपघातांमुळे नागरिक भीतीमध्ये जगतात. अपघात झाले आणि नागरिकांचे जीव गेले की प्रशासन अॅक्टिव्ह असल्याचा आव आणते. त्यानंतर काही दिवसांत पुन्हा परिस्थिती 'जैसे थे' होते. या रस्त्याच्या रुंदीकारणाचे काम प्राधान्याने वेगाने पूर्ण करणे गरजेचे आहे.
-प्रभाकर कदम, रहिवासी, कात्रज.
भूसंपदनाअभावी रुंदीकरण रखडले असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी महापालिका प्रशासन उड्डाणपूल वाढवण्याचा प्रस्ताव आणत आहे. मात्र, या सर्व प्रक्रियेला पूर्ण होण्यासाठी खूप वेळ लागेल. त्यामुळे नागरिकांसाठी प्राधान्याने 50 मीटर रस्ता पूर्ण करून घ्यावा.
-डॉ. सुचेता भालेराव, रहिवासी, कात्रज.
हेही वाचा