पुणे

मराठी भाषा अभिजात करण्यासाठी प्रमाणपत्राची गरज का? : महेश एलकुंचवार

Laxman Dhenge
पुणे : पुढारी वृत्तसेवा  : 'मराठी भाषेचा अभिजात दर्जा हा सध्याचा ऐरणीवरचा प्रश्न झाला आहे. पण, मराठी भाषा अभिजात करण्यासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज का भासते?' असा सवाल ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी शनिवारी उपस्थित केला. ती अभिजात करण्याची जबाबदारी समाज म्हणून आपली आहे, असेही त्यांनी सांगितले.  मराठी साहित्य जगतातील प्रतिभाशाली लेखक आणि प्रकाशक श्री. पु. भागवत यांचे यंदाचे वर्ष हे जन्मशताब्दी वर्ष आहे.
यानिमित्ताने राजहंस प्रकाशन आणि अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी श्री. पु. भागवत यांचे पुत्र आणि मौज प्रकाशन गृहाचे अशोक भागवत, राजहंस प्रकाशनाचे संचालक दिलीप माजगावकर आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ आदी उपस्थित होते. महेश एलकुंचवार म्हणाले, 'परदेशात अनेक चळवळी आणि संस्था शतकानुशतके चालू राहतात. कारण तिथल्या सर्जनशील पिढीचे अग्रक्रम समान असतात.
आपल्याकडे लेखनाचा मोठा आवाज ऐकूच येत नाही, त्यात बरेचदा अभिनिवेश असल्याचे मी श्री. पु. भागवत यांना बोलून दाखविले. त्या वेळी, 'समाज जसा असतो तसे लेखक समाजाला मिळतात', असे उत्तर त्यांनी मला दिले होते. त्या वेळी मराठी समाजाच्या एकूण 'अभिजात'तेची ओळख त्यांनी मला करून दिली, असे मी मानतो.' डॉ. सुधीर रसाळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ गायक पं. सत्यशील देशपांडे यांची 'शब्द शास्त्रीय संगीतातला..' ही विशेष मैफल रंगली.
आपल्याकडे अनेक संस्था आणि चळवळींचे आयुर्मान अवघे  दहा वर्षांचे असते. 'सत्यकथा' ही मराठी साहित्यातील मोठी वाङ्मयीन घडामोड होती. पण आजच्या पिढीला कालच्या या सांस्कृतिक घडामोडींविषयी आस्था नाही.
– महेश एलकुंचवार,  ज्येष्ठ नाटककार.
हेही वाचा
SCROLL FOR NEXT