Weather Updates
अतिवृष्टीचे इशारे का ठरत आहेत फोल? file photo
पुणे

अतिवृष्टीचे इशारे का ठरत आहेत फोल?

पुढारी वृत्तसेवा

हवामान विभागाने गेल्या तीन दिवसांपासून कोकणात दिलेले अतिवृष्टीचे इशारे फोल ठरले आहेत. रविवारी मान्सूनने न बरसताच अवघे राज्य व्यापल्याची घोषणा हवामान विभागाने केली. अतिवृष्टीचे इशारे देऊनही मान्सून खंडित स्वरूपातच पडत आहे.

अंदाजानुसार मान्सून पडलाच नाही

हवामान विभागाने २० जूनपासून राज्यात मान्सून सक्रिय झाल्याचे जाहीर केले होते. यात कोकणात अतिवृष्टी, तर उर्वरित राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे, असा अंदाज दिला होता. मात्र तीन दिवस उलटून गेले, तरी त्या अंदाजानुसार मान्सून पडलाच नाही. उलट मान्सून खंडित स्वरूपातच अजूनही पडत आहे. रविवारी राज्यातील बहुतांश भागांत कडक ऊन होते. उन्हामुळे पुन्हा घराघरांत पंखे, कुलर अन् एअर कंडिशनर सुरू झाले होते. अस्वस्थ करणाऱ्या वातावरणामुळे नागरिक हैराण झाले होते. रविवारी मान्सून अरबी समुद्राच्या आणखी काही भागांत गेला. तसेच गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये पुढे गेला आहे. महाराष्ट्र-केरळ किनाऱ्यापासून समुद्रसपाटीपर्यंत एक कुंड तयार झाले आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटकात वादळी वारे ताशी ४० ते ५० कि.मी. वेगाने वाहत आहे. मात्र कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात खंडित स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे.

का ठरत आहेत इशारे फोल ?

शनिवारी कोकणाला रेड, तर रविवार ते सोमवार ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात तेवढा पाऊसच पडला नाही. उर्वरित राज्याला यलो अलर्ट देण्यात आला होता. काही हवामान तज्ज्ञांच्या मते यंदा जूनमधील पाऊस हा खंडित स्वरूपाचा असून, हवेचा दाब असमान असल्याने तो कमी-जास्त प्रमाणात पडत आहे.

SCROLL FOR NEXT