महाविकास आघाडी File Photo
पुणे

Maharashtra Assembly Polls: शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? चर्चेला उधाण

Elections 2024: निवडणुकीसाठी आठवड्याचा अवधी उरला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Pune Politics: शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याबद्दल चर्चेला उधाण आले आहे. चौका-चौकांत गप्पांचे फड रंगत आहेत. निवडणुकीसाठी आठवड्याचा अवधी उरला आहे. महायुती, महाविकास आघाडीच्या वतीने प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली सभा, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन करून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात प्रचारात महायुतीने आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे.

शिवाजीनगर मतदारसंघात भाजप महायुतीचे सिद्धार्थ शिरोळे, महाविकास आघाडीचे दत्ता बहिरट आणि काँग्रेसचे बंडखोर मनीष आनंद यांच्यासह 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतमोजणीच्या दिवशी शिवाजीनगर येथील मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने होता, हे स्पष्ट होईल.

मिश्र वस्तीचा भाग असणार्‍या शिवाजीनगर मतदारसंघातील उमेदवारांकडून पदयात्रा, दुचाकी-जीप रॅली, मेळावे, बैठका अशा पारंपरिक पद्धतीच्या प्रचारावर भर देण्यात येत आहे. तर भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांकडून मतदारांच्या घरोघरी जाऊन वैयक्तिक भेटीगाठीसाठी अधिक प्राधान्य दिले जात आहे. या प्रचारादरम्यान शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून स्थानिक प्रश्नांवर भर देण्यात येत आहे, तर महायुतीकडून केलेली कामे, समस्या सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे दाखले दिले जात आहेत.

कधीकाळी शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला असणारा शिवाजीनगर मतदारसंघ 2014 पासून भाजपच्या ताब्यात आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विजय काळे हे निवडून आले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काळे यांच्या पत्ता कट करून भाजपने नगरसेवक असलेल्या सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत शिरोळे यांनी काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांचा अवघ्या 5 हजार 124 मतांनी पराभव केला.

या वेळी वंचितचा उमेदवार नसता तर कदाचित वेगळा निकाल लागला असता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवाजीनगरमधून भाजपला अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. विद्यमान आमदार असताना मुरलीधर मोहोळ यांना केवळ 3 हजार 800 मतांचा लिड मिळाला.

घटते मताधिक्य शिरोळे यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात होती. यानंतर सिद्धार्थ शिरोळे यांनी जनसंपर्कावर भर देऊन मतदारसंघ चाळून काढला. गोखलेनगर भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा संपन्न झाली. तर 15 नोव्हेंबर रोजी औंध भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात प्रचारात महायुतीने आघाडी घेतली असल्याची मतदारांमध्ये चर्चा आहे.

तर दुसरीकडे वैयक्तिक कारणामुळे काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट हे प्रचार मोहिमेत थोड्या उशिराने उतरले. यानंतर त्यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी जीप रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर बहिरट यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. या वेळी काँग्रेसकडून जास्तीत जास्त स्थानिक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मतदारांचे प्रश्न ऐकून घेण्यात येत आहेत.

शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी ही शिवाजीनगर मतदारसंघ भागात होत असल्याचा दावा काँग्रेसकडून प्रचारादरम्यान उपस्थित केला आहे. अनेक महिन्यांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषी चौकात वाहतूक कोंडी होत असून ती कधी सुटणार असा प्रश्न विचारला जात आहे. पाटील इस्टेट येथील झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचे काय झाले असे विचारण्यात येत आहे. तर काँग्रेसचा उमेदवार निवडून आल्यास या मतदारांना एसआरच्या आता जिथे त्यांची जागा आहे तेथे अंतर्गत 550 स्क्वेअर फुटाचे घर देण्यात येईल, असेही प्रचारादरम्यान नागरिकांना सांगितले जात आहे.

शिवाजीनगर मतदारसंघातील प्रमुख प्रश्न

वाहतूक कोंडी

झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन

असंतुलित पाणीपुरवठा

रस्त्यांवरील खड्डे

काँग्रेससमोर बंडखोरीचे आव्हान

गत निवडणुकीत शिवाजीनगर मतदासंघात सध्याचे महायुतीचे व महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या सिद्धार्थ शिरोळे आणि दत्ता बहिरट हे पुन्हा एकदा आमने-सामने आहेत. मागील निवडणुकीत बहिरट यांचा चुरशीच्या लढतीत निसटता पराभव झाला होता. त्यामुळे या वेळी काँग्रेसने विजय मिळवायचाच या इराद्याने नियोजन केले आहे. मात्र काँग्रेसचे बंडखोर मनिष आनंद यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने काँग्रेससमोर भाजपसह बंडखोरीचे आव्हान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT