

जळगाव : गद्दार खुर्ची मिळवण्यासाठी लाचार झालेले आहेत. महाराष्ट्र खड्ड्यात गेला तरी चालेल खुर्ची मिळाली पाहिजे. त्यातील अनेक गद्दारांना खुर्चीही दिली होती. मात्र, त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.
चाळीसगाव येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, राज्यात येणारे अनेक मोठे उद्योग गुजरातमध्ये जात आहेत. त्यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर संकट येत असेल त्यावेळी आपण एकत्र आले पाहिजे, अन्यथा हे महाराष्ट्र लुटून फस्त करतील. भाजपत आता सच्चे लोक उरलेले नाहीत. भाजपतील निष्ठावंत फक्त सतरंज्या उचलण्यासाठी राहिलेले आहेत. त्यांच्या डोक्यावर भ्रष्टाचारी लोक आणून बसवले असल्याची टीकाही त्यांनी केली. ते म्हणाले, आचारसंहिता कायदा सर्वांना सारखा लागू झाला पाहिजे, माझ्या बॅगेची तपासणी होते तर मोदी-शहा यांच्यासुद्धा बॅगेची तपासणीही करतात का, असा प्रश्नही ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.