Pune BJP President Selection
पुणे: भाजपच्या शहराध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. अध्यक्ष निवड करताना आता जात हा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार की आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वांना सामावून घेण्याची क्षमता असलेल्यांना संधी दिली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजपात संघटनात्मक बदल सुरू असून, मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर झाल्यानंतर आता शहराध्यक्ष निवडले जाणार आहे. पुण्यात शहराध्यक्षपदाच्या निवडीसाठी निरीक्षकांनी पदाधिकार्यांची मते जाणून घेतली असून, येत्या दोन दिवसांत नवीन अध्यक्षांचे नाव जाहीर होणार आहे.
मात्र, अध्यक्षपदासाठी कोणाला संधी दिली जाणार, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. विद्यमान अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह माजी सभागृह नेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, वर्षा तापकीर अशी काही प्रमुख नावे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे. आता अध्यक्ष निवडताना भाजप कोणता निकष लावणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
कसबा पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाजाला डावल्याची भावना निर्माण झाली होती, त्याचा काहीसा फटका भाजपला बसला होता, त्यामुळे अध्यक्षपदी घाटेंना संधी देऊन ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर मेधा कुलकर्णींना राज्यसभेवर संधी मिळाली. त्यामुळे ही नाराजी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पूर्णत: शमली.(Latest Pune News)
आता आगामी महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना पुन्हा जातीसह काही फॅक्टर महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे तो डोळ्यासमोर ठेवूनच अध्यक्ष निवडला जाईल, असे सांगितले जात आहे. प्रामुख्याने ओबीसी समाज हा भाजपसमवेत असतो. विधानसभा निवडणुकीत ते प्रकर्षाने दिसून आले.
त्यामुळे आता ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व मिळावे अशी आग्रही भूमिका आहे. तसे झाल्यास बीडकर आणि भिमाले यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकेल, तर मराठा समाजाचा विचार झाल्यास शिळीमकर अथवा तापकीरांचा पर्याय असेल. मात्र, जाती व्यतिरिक्त महापालिका निवडणुका आधीचे मॅनेजमेंट करू शकणार चेहरा तेवढाच महत्त्वाचा ठरणारा आहे.
महापालिकेच्या प्रभाग रचनेपासून उमेदवार निवडीपर्यंत जाणकार असलेला आणि सर्वांना समावून घेण्याची क्षमता असलेल्या चेहर्यांचा विचार होऊ शकतो असे भाजपमधील वरिष्ठ पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता अध्यक्ष निवडताना भाजप कोणता निकष लावणार यावरच अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे निश्चित होणार आहे.