

BJP’s plan to weaken Congress
पुणे: काँग्रेस पक्ष आता खाली करून टाका, त्यांचे खच्चीकरण झाले आहे, त्यांना टार्गेट करून चांगले कार्यकर्ते आपल्या पक्षात घ्या, असा कानमंत्र महसूलमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंडळ अध्यक्षांना दिले. तुमची काळजी करू नका, आधी तुम्हाला संधी दिली जाईल, मग त्यांना संधी देऊ, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या पुणे शहर आणि जिल्ह्यातील मंडळ अध्यक्षांचा सत्कार आणि संवाद कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. या वेळेस केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, राहुल कुल, महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. (Latest Pune News)
या वेळेस पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना बावनकुळे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे, मे अखेरपर्यंत त्याचा निकाल लागेल अशी आम्हाला खात्री होती.
मात्र, त्यावर निर्णय झाला आहे. राज्य सरकारने न्यायालयात ज्या गोष्टी सादर करायच्या होत्या, त्या सर्व सादर केल्या आहेत, आता पुढच्या सुनावणीत निकाल लागल्यास पावसाळ्यानंतर निश्चितपणे महापालिका, जिल्हा परिषद यांच्या निवडणुका होतील, त्यासाठी पदाधिकार्यांनी तयारीला लागावे. राज्यात आपली सत्ता आहे, सत्तेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना न्याय मिळेल.
तब्बल 887 महामंडळे आणि मंडळे आहेत. महायुतीत त्यांच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. येत्या जून अखेरपर्यंत महामंडळांचे वाटप होईल, त्यामाध्यमातून आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठी संधी उपलब्ध होईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, पुणे जिल्ह्यात आपण माजी आमदार संग्राम थोपटे यांचा पक्ष प्रवेश घेतला, त्यामुळे निश्चितच पक्षाची ताकद वाढणार आहे. राज्यातील 115 मतदारसंघात अद्यापही भाजप अपूर्ण आहे.
त्यासाठी काँग्रेस पक्ष खाली करा, त्यांचे जेवढे कार्यकर्ते आपल्याकडे येतील तेवढा आपला राजकीय फायदा आहे. तुम्ही ही काळजी करू नका की मी त्याला पक्षात आणले तर माझं काय होईल, तुमच्यासाठी आम्ही आहोतच, पक्षात आधी तुम्हाला संधी मिळेल आणि मग त्यांना संधी दिली जाईल, असे स्पष्टीकरणही बावनकुळे यांनी यावेळी दिले.
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांचे कौतुक
पहेलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जखमींच्या मदतीसाठी केलेल्या कामाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी कौतुक करीत त्यांचा विशेष सत्कारही या वेळी केला.
माधव भंडारींवर सर्वांत जास्त अन्याय
भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्यावर पक्षात सर्वांत जास्त अन्याय झाला असल्याची कबुली बावनकुळे यांनी या वेळी दिली. मात्र, तरीही पक्षावर नाराज न होता ते आपले काम करीत राहिले, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.