पुणे: मुंबई उच्च न्यायालयाची इमारत, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या जुन्या इमारती ब्रिटिशांनी अप्रतिम बांधल्या आहेत. ब्रिटिशांच्या काळात हे होऊ शकले, मग आत्ताच्या काळात का होत नाही? देश जगात तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होत असताना इमारती, पूल पडत आहेत, त्याचे काय? त्याला कोण जबाबदार आहे? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी उपस्थित करत सध्याच्या कामाच्या दर्जावर बोट ठेवले.
‘प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन’चे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी अध्यक्ष शेषराव कदम, सचिव अजय कदम, खजिनदार अजय ताम्हणकर, अशोक मोरे आदी उपस्थित होते. (Latest Pune News)
पवार म्हणाले, पूर्वीचे लोक तुमच्यापेक्षा जास्त हुशार होते का? बांधकाम भारतीयांनीच केले, पण फक्त त्याची देखरेख ब्रिटिशांनी केली होती. मावळ तालुक्यातील कुंडमळ्यामध्ये पूल पडल्यानंतर जिल्ह्यातील धोकादायक बांधकाम तपासणी करण्यास सांगितले. ब्रिटिशांनी बांधलेल्या इमारती, पुलांना शंभर वर्षे झाली, की त्याची आठवण करणारे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला येते.
सध्याच्या काळात अशा प्रकारची कामे बघण्यास मिळत नाहीत. नवीन तंत्रज्ञान आले आहे, त्याचा वापर झाला पाहिजे. इमारती मजबूत झाल्या पाहिजेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना किती वर्षांची इमारत झाली म्हणून विचारले की, सांगतात चाळीस वर्षांची झाली आता नवीन बांधू, असे सहज बोलून जातात.
‘स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग’ हे केवळ तांत्रिक क्षेत्र नसून मानवी जीवनाला सुरक्षित आणि समृद्ध करणारे महत्त्वाचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. ज्या इमारतीमध्ये राहतो, जे पूल वापरतो, ज्या पायाभूत सुविधा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत, त्याचा पाया ‘स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग’वर आधारित आहे.
स्ट्रक्चरल इंजिनिअर हे समाजाच्या प्रगतीसाठी भक्कम पाया घालतात. शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. पुणे शहर विद्येचे माहेरघर आहेच, त्याचबरोबर अभियांत्रिकी शिक्षणाचे आणि उद्योगाचे केंद्र असल्याचे पवार यांनी सांगितले. प्रास्ताविकात अजय कदम म्हणाले, काळानुसार मोठमोठ्या इमारती, पूल केले जातात. पूर्वी स्ट्रक्चल इंजिनिअरिंगबाबत फारशी माहिती लोकांना नव्हती. आता फार मोठे बदल झाले आहेत.
संघटना स्थापन झाल्यामुळे अनेकदा फायदा होणार आहे. तर मसध्या कुठलीही दुर्घटना घडली तर स्ट्रक्चरल इंजिनिअरवर कारवाई केली जाते. त्यामुळे नवीन लोक येण्यास तयार नाहीत. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग करताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो, अशी खंत शेषराव कदम यांनी व्यक्त केली. वर्षा कानेटकर यांनी सूत्रसंचालन केले, तर अजय ताम्हणकर यांनी आभार मानले.
पुण्यात आम्ही विविध इमारती बांधत आहोत. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, शालेय शिक्षण भवन, नोंदणी भवन, जीएसटी भवन, सामाजिक न्याय विभाग, कृषी भवन, महिला बालविकास भवन यांसह अजून अनेक इमारती आम्ही उभ्या करत आहोत. नवीन राजभवन इमारत बांधकाम करणार असून, ‘यशदा’ची नवीन इमारत करण्यासाठी कामकाज सुरू केले आहे.- अजित पवार, उपमुख्यमंत्री