Pune Politics: राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती एकत्र निवडणूक लढवत असतानाच पुण्यात मात्र महायुती तुटणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भाजपने उमेदवार दिलेल्या खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे, तर वडगाव शेरी मतदारसंघात भाजपकडून अधिकृतरीत्या उमेदवार दिला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
महायुतीत प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काही जागांवर मतभेद होते. त्यात पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचा समावेश होता. अखेर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय झाला. त्यानंतर या जागेवर राष्ट्रवादीने विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांची उमेदवारी जाहीर केली.
मात्र, त्यानंतरही भाजपचे आमदार जगदीश मुळीक यांनी निवडणूक लढविण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे. त्यातच आता सोमवारी घडलेल्या घडामोडींनंतर खडकवासला मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
विशेष म्हणजे या मतदारसंघात भाजपकडून आमदार भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली आहे. तापकीर यांनी सोमवारी अर्जही दाखल केला आहे. असे असतानाही धनकवडे यांनी अर्ज भरण्याचा निर्णय घेतल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
त्यातच उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलडाण्यात पत्रकारांशी बोलताना एक-दोन जागांवर महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, असे सूतोवाच केले. त्यामुळे पुण्यातील खडकवासला आणि वडगाव शेरी मतदारसंघांत मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृतरीत्या अद्याप निर्णय झालेला नाही.