खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : पर्यटकांसह हजारो नागरिकांची वर्दळ असलेल्या खडकवासला बाह्यवळण मार्गावर लाखो रुपये खर्च करून महापालिकेने कोल्हेवाडीपर्यंत पथदिव्यांचे खांब उभे केले आहेत. मात्र, त्यावर अद्यापही पथदिवे लावण्यात आले नाहीत. या खांबांवर दिवे कधी बसविले जाणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. सध्या उन्हाळी सुट्या तसेच सण-उत्सवामुळे खडकवासला सिंहगड परिसरात पर्यटकांसह भाविकांची गर्दी वाढली आहे. रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू आहे.
रस्त्यावर पथदिवे नसल्याने बाह्यवळण रस्त्यासह मुख्य सिंहगड रस्त्यावर अपघात वाढले आहेत.
सर्वात गंभीर स्थिती किरकटवाडी फाटा ते नांदेड फाट्यापर्यंतच्या रस्त्याची आहे. या रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पथदिव्यांच्या खांबांवरील अनेक पथदिवे काही तासांतच बंद पडले आहेत. पुरेसा वीजपुरवठा व निकृष्ट केबलमुळे पथदिव्यांची उघडझाप सुरू आहे. तर काही बंद पडले आहेत. खडकवासला बाह्यवळण रस्त्यासह मुख्य सिंहगड रस्त्यावर पथदिव्यांअभावी दुर्घटनांची टांगती तलवार उभी आहे. नांदेड फाट्याजवळ जल अकादमी, किरकटवाडी फाट्यावर रामेश्वर पतसंस्था अशा ठिकाणी अपघातही होत आहेत.
महापालिकेत समावेश केल्यानंतर प्रशासनाने नांदेड,किरकटवाडी, खडकवासला आदी ठिकाणी प्रशासकीय निधीतून पथदिव्यांची उभारणी केली. काही भागातील रस्ते प्रकाशाने उजळून निघाले आहेत. मात्र, खडकवासला बाह्यवळण रस्ता अद्यापही अंधारात आहे. पथदिव्यांचे खांब क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून उभे केले आहेत. मात्र, खांबावर पथदिवे बसविण्याचे काम विद्युत विभागाने केले नाही.
सिंहगड रस्त्यासह खडकवासला बाह्यवळण रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. लाखो रुपये खर्च करूनही खांबावर दिवे बसवले नाहीत. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने दिवे बसविण्यात यावेत.
-सौरभ मते, माजी सरपंच, खडकवासला.
नांदेड फाटा ते किरकटवाडी फाट्यापर्यंतच्या पथदिव्यांना पुरेसा वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे पथदिवे बंद होत आहेत. पथदिव्यांना पुरेसा वीजपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. तसेच केबलही लवकरच बदलण्यात येतील.
-संदीप खलाटे, सहायक आयुक्त, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय.
हेही वाचा