पुणे

बिबट्यांच्या नसबंदीला परवानगी कधी? जुन्नरकर विचारणार उमेदवारांना प्रश्न

Laxman Dhenge

नारायणगाव : जुन्नर तालुक्यात दररोज बिबट्याचा कुठे ना कुठे पाळीव प्राणी, मानवावर होत असलेल्या हल्ल्यामुळे जुन्नरची जनता त्रस्त झाली आहे. वनविभाग बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी काही उपाययोजना करणार आहे की नाही आणि वनखात्याला हे जमत नसेल, तर आमची व्यवस्था करा. आम्ही शेती-व्यवसाय बंद करतो, अशा कडवट प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारांना या प्रश्नाला तोंड द्यावे लागणार आहे. वनखात्याने शासनाला बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव पाठवला आहे. परंतु, शासनाच्या लालफितीच्या कारभारामध्ये प्रस्तावाला लवकर मंजुरी मिळेल याबाबतची शक्यता अजिबात वाटत नाही.
जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या चारशे-पाचशेच्यावर असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

वनखाते मात्र अधिकृत आकडा सांगत नाही. दररोज होणार्‍या बिबट्यांचे हल्ल्यामुळे जुन्नरची जनता त्रस्त झाली आहे. दिवसा, रात्री-अपरात्री दर्शन हमखास होतेच. आता दिवसाढवळ्या रस्त्याने फिरताना बिबट्या आढळतो. त्यामुळे शेतामध्ये पाणी भरायला जाताना शेतकरी घाबरतो. मजूरदेखील बिबट्याच्या भीतीने शेतामध्ये काम करायला जाताना घाबरून जातात. जुन्नर तालुक्यामध्ये 15 ते 20 ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी सध्या पिंजरे लावले आहेत. एखाद्या पिंजर्‍यात बिबट्या अडकला, तर त्याला बंदिस्त केले जाते असे नाही तर भीमाशंकरच्या अभयारण्यात किंवा जवळपास सोडून दिले जाते. हा बिबट्या पुन्हा परत या ठिकाणी येतो किंवा दुसरा बिबट्या राज्य निर्माण करतो.

वनखात्याचे कर्मचारी हतबल

बिबट्याच्या दररोज होणार्‍या हल्ल्यामुळे वनखात्याचे कर्मचारीदेखील हतबल झाले आहेत. रात्री- अपरात्री त्यांना बिबट्याबाबत फोन येत असतात. वेळेत कर्मचारी पोचला नाही तर शेतकर्‍यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागते. जुन्नर तालुक्यात वाढत असलेली बिबट्यांची संख्या याबाबतचा शासनाने तातडीने विचार करून बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी नसबंदीच्या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी मिळणे गरजेचे आहे. दररोज कुठे ना कुठे बिबट्याच्या होत असलेल्या हल्ल्यामुळे जुन्नरची जनता त्रस्त झाली असून, एक दिवस याचा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT