यवत : पुढारी वृत्तसेवा : यवत येथील सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार एकेकाळचे त्यांचे समर्थक भाजपचे आमदार राहुल कुल आणि अजित पवार गटाचे माजी आमदार रमेश थोरात यांच्यावर काय बोलणार? याची उत्सुकता दौंड तालुक्यात आहे. मागील आठवड्यात शरद पवार यांनी दौंड शहरात हजेरी लावत भाजपचे ज्येष्ठ नेते प्रेमसुख कटारिया यांची भेट घेत तालुक्यात राजकीय खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे यवतमधील सभेत शरद पवार काय बोलतात? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर दौंड तालुक्यातील कट्टर राजकीय विरोधक असणारे भाजप आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात हे एकत्रितपणे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना दिसत आहेत. शिवाय, बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये तालुकापातळीवर गटबाजी उफाळून आली असताना दौंड तालुक्यात मात्र याउलट चित्र पाहायला मिळत असून, कुल आणि थोरात एकदिलाने प्रचारात भाग घेत आहेत. प्रचारात प्रामुख्याने महायुतीच्या नेत्यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावर टीका करणे टाळले असून, मोदींच्या व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नावावर मते मागण्याची भूमिका ठेवलेली दिसत आहे.
दुसरीकडे, मागील वेळी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लढलेल्या महायुतीच्या उमेदवार कांचन कुल आणि भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर सुप्रिया सुळे यांनी तालुक्यात आल्यानंतर टीका करणे टाळले असून, त्यांची स्तुतीच केली आहे; तर अजित पवार गटाचे रमेश थोरात यांच्यावर बोलणे सुळे यांनी टाळले आहे. त्यामुळे कुल आणि थोरात यांच्याविरोधात शरद पवार बोलणार का आणि काय बोलणार? याची उत्सुकता आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपने उमेदवारी दिली होती, त्या वेळी देखील कांचन कुल यांना दौंड तालुक्यात 7 हजार मतांच्या आसपास आघाडी मिळाली असली तरी स्थानिक उमेदवार म्हणून कांचन कुल यांना अपेक्षित मतदान झाले नव्हते. त्या वेळी देखील कुल आणि सुळे यांनी एकमेकांवर टीका करणे टाळले होते. परंतु, या वेळी मात्र लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून पवार कुटुंबात एकमेकांवर टीका सुरू असून, तालुक्यातील नेत्यांना देखील यात भरडले जात आहे. त्यामुळे शरद पवार हे कुल आणि थोरात यांच्या एकत्र येण्यावर काय बोलतात? हे पाहणे महत्त्वाचेठरणार आहे.
हेही वाचा