शिरूर: ‘साहेब जमीन नापीक झाली आहे, संत्र्यांच्या बागा पार उद्ध्वस्त झाल्या आहेत, जनावरे मृत्युमुखी पडत आहेत, राहणे मुश्कील झाले आहे, पाणी पिण्यासाठी योग्य नाही, एवढी बेकारी शेतकर्यांची झाली असून, जमिनी विकाव्या असे वाटत आहे.
मात्र जमिनी कुणीही घ्यायला तयार नाही, आम्ही करायचं काय? जगून काय फायदा?’ असा सवाल शेतकर्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमोर करीत आता तुम्हीच न्याय द्या, असा टाहो फोडला. (Latest Pune News)
रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र इन्व्हायरो पॉवर लि. कंपनीचा प्रदूषणामुळे निमगाव भोगी परिसरात होत असलेल्या प्रदूषणामुळे पाण्यासह शेतीच्या होत असलेल्या नुकसानीची पाहणी माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. या पाण्यामुळे निमगाव भोगी, सरदवाडी, शिरूर ग्रामीण, अण्णापूर आदी परिसराला फटका बसला असून गेल्या अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थ यासाठी संघर्ष करत आहेत.
या वेळी माजी आमदार अॅड. अशोक पवार, सूर्यकांत पलांडे, देवदत्त निकम, विकास लवांडे, शेखर पाचुंदकर, राहुल पाचर्णे, लक्ष्मीबाई जाधव, संतोष शिंदे, विठ्ठल घावटे, शशिकांत दसगुडे, सतीश पाचंगे, बापूसाहेब शिंदे, विश्वास ढमढेरे, विजेंद्र गद्रे, दादा पाटील घावटे, विक्रम पाचुंदकर, मल्हारी काळे, यशवंत पाचंगे, पूजा गणेश कर्डीले आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
या बाबत ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत तक्रारीची दखल घेत शरद पवार यांनी संबंधित कंपनीने जेवढी काळजी घ्यायला हवी होती, तेवढी घेतली नसल्याचे सांगितले. खा. पवार म्हणाले, कंपनीच्या प्रदूषणाचा परिणाम पाणी, जमीन, पीक, जनावरे यांच्यावर होत आहे. जमिनीचा पोत बिघडला आहे.
निमगाव भोगीसह परिसरातील अन्य गावात कंपनीचा प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मुंबई येथे पर्यावरण व उद्योगमंत्री यांची बैठक होत असून या बैठकीस आपण हजर राहणार आहोत. या कंपनीसाठी नव्याने देण्यात आलेली जमीन एमआयडीसीने रद्द करावी व झालेल्या नुकसानीची भरपाई कंपनीने द्यावी, अशी मागणी पवार यांनी केली. या विषयात राजकारण नको, असे देखील आवाहन पवार यांनी या वेळी केले.
एमईपीएल कंपनीच्या प्रदूषणाबाबत निमगाव भोगी ग्रामस्थांचा विविध प्रश्नांवर निर्णय घेण्याकरिता पर्यावरण व उद्योग विभागाच्या मंत्र्यांसमवेत माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यासोबत घेत मुंबई येथे लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर चर्चा करण्यास तयार असल्याची माहिती उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील या कंपनीचा प्रदूषणाचा विषय संसदेत मांडला. कंपनीचा प्रदूषणामुळे शेती, जनावरे, पिके व पाण्यावर परिणाम होत आहे. कंपनीचा परिसरातील पाण्याचा टीडीआर अधिकचा आहे. कंपनीचे काम स्वच्छ असेल तर कंपनीस प्रयोगशाळेत सॅम्पल बदलण्याची वेळ आली नसती. पाणी व माती पुनरुजीवनाची जबाबदारी कंपनीने घ्यावी, असे देखील खा. डॉ. कोल्हे म्हणाले.
निमगाव भोगीच्या सरपंच ज्योती सांबारे म्हणाल्या, महाराष्ट्र इन्व्हॉयरो पॉवर लि. (एमईपीएल) कंपनी बंद करावी. या कंपनीच्या प्रदूषित पाण्यामुळे निमगाव भोगी परिसरातील शेती नापीक होत असून जनावरे दगावली जात आहेत. ही कंपनी राज्यभरातील घातक व विषारी कचरा संकलित करते. हा कचरा कोणतीही कारवाई न करता जमिनीत गाडतात. 17 वर्षांपासून कंपनीविरोधात लढा देत असून ही कंपनी बंद करावी अशी मागणी त्यांनी केली.सूत्रसंचालन प्रकाश थोरात यांनी केले तर आभार पांडुरंग अण्णा थोरात यांनी मानले.