पुणे : पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ मुलींच्या हॉकी स्पर्धेत मुंबई विद्यापीठ, एलएनआयपीई ग्वाल्हेर, महाराज कृष्णकुमार सिंहजी भावनगर गुजरात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान-जयपूर या संघांनी प्रतिस्पर्धी संघाचा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली.
एलएनआयपीई ग्वाल्हेर संघाने पॅसिफिक युनिव्हर्सिटी उदयपूर संघाचा १६-० असा पराभव केला. महाराज कृष्णकुमार सिंहजी भावनगर गुजरात संघाने राणी दुर्गावती विद्यापीठ जबलपूर संघाचा ११-० असा सहज पराभव केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संघाने देवी अहिल्यानगर विद्यापीठ इंदूर संघाचा १०-० असा पराभव केला. युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान, जयपूर संघाने पंडीत दीनदयाळ उपाध्याय विद्यापीठ सिकर संघाचा ६-० असा सहज पराभव करून आगेकूच केल.
चुरशीने लढल्या गेलेल्या सामन्यात महाराज सयाजीराव विद्यापीठ बडोदा संघाने गुजरातच्या एसजीएसयू-देसर संघाचा ३-२ असा पराभव केला. कुमकुम कुमार आणि कोमल गुर्जर यांच्या गोलमुळे महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ अजमेर संघाने पारूल विद्यापीठ गुजरात संघाचा २-१ असा पराभव केला. लक्ष्मी यादव, हितल गोस्वामी आणि करिष्मा माहतो यांनी नोंदविलेल्या गोलांच्या जोरावर मुंबई विद्यापीठ संघाने स्कोप ग्लोबल युनिव्हर्सिटी भोपाळ संघाचा ३-० असा पराभव केला.