House Pudhari
पुणे

Real Estate Construction Cost Rise: नागरिकांचा गृहप्रवेश पडणार लांबणीवर!मध्यपूर्वेतील संघर्षाचा परिणाम

२०२६ मध्ये ५.४० लाख घरे देण्याचे बांधकाम व्यावसायिकांसमोर आव्हान

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पश्चिम आशियातील संघर्षामुळे इंधनाच्या किमतीतच वाढ झाली नसून, इतर साहित्यांची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. लोखंड, तांबे, सिमेंटसह विविध वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे २०२६मध्ये ५.४० लाख सदनिका ग्राहकांना हस्तांतरित करण्याचा दबाव बांधकाम व्यावसायिकांसमोर असेल.

कोविड-१९च्या कालावधीत २०२० या वर्षात, ४.६६ लाख घरांचे हस्तांतरण करणे अपेक्षित होते. साथरोगामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने बांधकाम व्यावसायिकांना अवघी २.१४ लाख घरे (४६ टक्के) हस्तांतरित करता आली. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यास त्याचे परिणाम काय होतात, याचा अंदाज बांधता येईल.

कॅलेंडर वर्ष २०२६ मध्ये पूर्ण होणाऱ्या घरांपैकी ७० टक्के घरे मुंबई, पुणे आणि बंगळुरू या शहरांमधील आहेत. त्यामुळे या शहरांना प्रकल्प पूर्ण करण्याबाबतच्या सर्वात मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज ॲनारॉक रिसर्चच्या ताज्या अहवालात वर्तविण्यात आला आहे.

ॲनारॉक समूहाचे कार्यकारी संचालक आणि संशोधन व सल्लागार विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत ठाकूर म्हणाले की, २०२६ मध्ये प्रमुख ७ शहरांमध्ये विक्रमी ५ लाख ४० हजार ४०० घरे पूर्ण करणे अपेक्षित आहेत. गेल्या दशकातील सर्वाधिक घरांचे हस्तांतरण चालू वर्षात होण्याचा अंदाज आहे. एकूण नियोजित हस्तांतरणांपैकी, मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे या पश्चिम भागातील बाजारपेठांचा वाटा ५७ टक्के इतका आहे.

खर्चाचा दबाव वाढला

भू-राजकीय संघर्षाचा प्रकल्पांच्या आर्थिक बाजूवर अपरिहार्यपणे परिणाम होईल. इंधन आणि वाहतुकीचा वाढचा खर्च, पोलाद, ॲल्युमिनियम, तांबे, विद्युत उपकरणे आणि बांधकाम प्रणाली यांसारख्या महत्त्वाच्या साहित्याच्या किमतीत होणाऱ्या वाढीमुळे बांधकाम प्रकल्पाचा खर्च वाढला आहे.

अशी आहे मुंबई-पुण्याची स्थिती

मुंबई महानगरामध्ये २०२६मध्ये सुमारे २ लाख ७ हजार ३०० घरे हस्तांतरित होणे अपेक्षित आहे, तर पुण्यात २०२६ मध्ये १ लाख ३०० घरे हस्तांतरित होण्याची शक्यता आहे. देशातील महानगरांमधील घर वितरणातील ५७ टक्के वाटा पुणे-मुंबईचा आहे.

दक्षिण भारतात बंगळुरूमध्ये ६९ हजार, हैदराबाद ६३,७०० आणि चेन्नई ३५,६०० अशी या शहरांमध्ये मिळून १ लाख ६८ हजार ३०० घरे हस्तांतरित होणे अपेक्षित आहे. उत्तर भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रमुख केंद्र असलेल्या नवी दिल्लीमध्ये केवळ ३९ हजार घरांचे प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. पूर्वेकडील कोलकाता शहरात २२,५०० घरांचे प्रकल्प पूर्ण होण्याचे नियोजन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT