पिंपरी : जंकफूडचे आहारातील प्रमाण वाढले आहे. मोबाईलच्या जडलेल्या व्यसनामुळे मैदानी खेळ खेळण्याकडे मुले दुर्लक्ष करीत आहेत. पर्यायाने, एका जागी बसून मुलांचे वजन वाढत आहे. त्यांचा लठ्ठपणा वाढत चालला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हे प्रमाण सध्या 1 ते 3 टक्क्यांपर्यंत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी मांडले आहे.
मुलांचा लठ्ठपणा वाढण्याची कारणे काय ?
- घरबसल्या जंकफूड, फ्राईड फूड मागविण्याचे प्रमाण वाढले
- कोरोनापासून मुलांचा अभ्यास ऑनलाईन सुरू झाल्याने मोबाईलवरील स्क्रीन टाईम वाढला
- तासनतास मुले मोबाईलवर गेम खेळत बसतात. काही मुलांना तर मोबाईलचे व्यसनच जडले आहे.
- मैदानी खेळांचे कमी झालेले प्रमाण, व्यायामाचा अभाव कारणीभूत
- संतुलित आहार, भाजीपाला यांचा आहारातील कमी वापर
- वडापाव, समोसे, कुरकुरे, चीप्स, पिझ्झा,
- बर्गर, बिस्किटे आदी झाले मुलांचे खाद्य
लठ्ठपणा वाढू नये म्हणून काय कराल ?
मुलांना नियमित अर्धा तास व्यायाम करण्याची सवय लावा.
ज्यांना दररोज व्यायाम करणे शक्य नाही त्या मुलांना मैदानी खेळांसाठी प्रवृत्त करायला हवे.
मोबाईल हातात घेऊन मुले तासनतास एकाच जागी बसून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
मुलांना पुरेसा संतुलित आहार द्यावा. त्यामध्ये पौष्टिक खाद्यपदार्थ, पालेभाज्या आणि फळांचा समावेश असावा.
लठ्ठपणा वाढल्याने धोका काय ?
मुलांमध्ये लहानपणातच लठ्ठपणा वाढत गेला तर मुले जसजशी मोठी होऊ लागतात तसतसा त्यांचा त्रास वाढत जातो. लठ्ठपणावर नियंत्रण मिळविणे अवघड होऊन जाते. पर्यायाने, लहान वयातच लठ्ठपणामुळे मुले मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजारांना बळी पडत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी मांडले आहे.
सर्वेक्षणाचे निष्कर्ष काय ?
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार, 2015-16 या वर्षात पाच वर्षाखालील मुलांमध्ये शरीराचे जास्त वजन (ओव्हरवेट) असण्याचे प्रमाण 2.1 टक्के होते. तर, 2019 ते 2021 दरम्यान झालेल्या सर्वेक्षणात हे प्रमाण 3.4 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे आढळले आहे. तर, 14.4 दशलक्ष इतक्या मुलांमध्ये लठ्ठपणा आढळला आहे. केंद्र सरकारच्या सर्वेक्षणानुसार 10 ते 17 वयोगटातील मुलांमध्ये मुलांमध्ये वजन वाढण्याचे प्रमाण 3.1 टक्के इतके आहे. तर, लठ्ठपणाचे प्रमाण 1.2 टक्के इतके आहे.
घराबाहेरील अन्नपदार्थ खाण्याकडे सध्या मुलांचा कल वाढला आहे. पिझ्झा, बर्गर यांची मागणी वाढली आहे. मुलांना सकस आहार आणि पुरेसा व्यायाम गरजेचा आहे. त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करायला हवे. मोबाईलमुळे मुले बराच वेळ एकाच जागी बसून असतात. त्यामुळे त्यावर नियंत्रण गरजेचे आहे.
– जगदीश ढेकणे, बालरोग तज्ज्ञ.
लहान मुलांचे विविध मैदानी खेळ खेळण्याकडे दुर्लक्ष होत आहे. ही मुले 2 ते 3 तास एकाच जागी बसून मोबाईलवर गेम खेळत बसतात. त्यांच्या शारीरिक हालचाली, व्यायाम कमी झाला आहे. पर्यायाने, त्यांच्यामध्ये लठ्ठपणा वाढत चालला आहे. हे प्रमाण 1 ते 3 टक्क्यांपर्यंत आढळते. पर्यायाने मुलांमध्ये लहानपणीच मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार होण्याचा धोका वाढला आहे.
– डॉ. दीपाली अंबिके, बालरोग विभाग प्रमुख, वायसीएम रुग्णालय, महापालिका.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.