Saswad News: पुरंदर तालुक्यात उभारण्यात येणारा आंतरराष्ट्रीय विमानतळ शेतकर्यांना विश्वासात घेऊनच उभारला जाईल, त्याचबरोबर तालुक्यात आयटी पार्क आणि लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सासवड (ता. पुरंदर) येथील पालखी तळावर पुरंदर-हवेलीचे महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत केली आहे.
या वेळी वासुदेव काळे, अशोक टेकवडे, बाबाराजे जाधवराव, रमेश कोंडे, संदीप हरपळे, पंडितराव मोडक, नाना भानगिरे, दिलीप आबा यादव, डॉ. ममता शिवतारे, उमेश गायकवाड, मंदार गिरमे, नीलेश जगताप, सचिन भोंगळे, अस्मिता रणपिसे, मंदार गिरमे, राजेश दळवी आदींसह शेतकरी, महिला व युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
विजय शिवतारे नेहमी लक्षवेधी असतात, शिवतारे म्हणजे एक घाव दोन तुकडे, कधी कधी मी त्यांना सांगतो, जरा सबुरीने घ्या, शिवतारे कधी रागावतात तर कधी कुणाला घाम फोडतात, त्यांच्या पाठीला माती लावण्यासाठी अनेक जण टपून बसलेत, असा टोला नाव न घेता अजित पवार यांना लगावत, पण आता त्यांना विधानसभेत पाठवण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
याच पालखीतळ मैदानावर दिलेला प्रत्येक शब्द मी पाळला आहे. हवेलीकरांचा कराचा प्रश्न सोडवला, नगरपरिषद निर्माण केली, गुंजवणी जलवाहिनीचे काम सुरू केले. महाविकास आघाडीने पुरंदर उपसाची तिप्पट केलेली पाणीपट्टी पुन्हा कमी केली. सासवड आणि जेजुरीला पाणी योजना मंजूर केल्या. जेजुरी विकास आराखडा मंजूर केला. आता जबाबदारी तुमची आहे.
विजय शिवतारे कामाचा माणूस आहे. पुरंदरचा किल्लेदार म्हणून विजय शिवतारे यांना विधानसभेत पाठवा, ते यंदा विजयाची गुढी उभारणार हे नक्की, काहीही झालं तरी पुरंदर शत्रूच्या हाती पडता कामा नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पुरंदर-हवेलीचे आमदार करतात तरी काय? : शिंदे
पुरंदर- हवेलीचा कुठलाही प्रश्न असला की विजय शिवतारे मंत्रालयात ठाण मांडून बसतात, प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी धावत असतात, मग पुरंदरचे आमदार करतात तरी काय? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला.