

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची शनिवारी (दि. 16) कोल्हापुरातील गांधी मैदानात सभा होत असून, या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. दुपारी 1 वाजता ही सभा होणार आहे. या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले आहे. प्रियांका गांधी यांची कोल्हापुरात प्रथमच सभा होत असल्यामुळे या सभेकडे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात जिल्ह्यात आता राष्ट्रीय नेत्यांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी गांधी मैदानात प्रियांका गांधी यांची सभा होणार आहे. या सभेची तयारी पूर्णत्वास आली आहे. काँग्रेससह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. खासदार शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्या या सभेस इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी गांधी कुटुंबातील इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या जाहीर सभा कोल्हापुरात झाल्या आहेत. प्रियांका गांधी मात्र सभेसाठी कोल्हापुरात प्रथमच येत आहेत.
आ. सतेज पाटील यांनी गांधी मैदान येथे महाविकास आघाडीमधील प्रमुख पदाधिकार्यांसोबत पाहणी करून चर्चा केली. सभेला येणार्यांची बैठक व्यवस्था, सभेच्या ठिकाणी वाहनांची पार्किंग व्यवस्था याची माहितीही त्यांनी घेतली. आपापल्या मतदारसंघातील प्रभागातील कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून ही निर्णायक सभा यशस्वी करावी, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी केले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के.पोवार, शिवसेनेचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले, संपर्कप्रमुख विजय देवणे, माजी उपमहापौर अर्जुन माने, विक्रम जरग, भूपाल शेटे, तौफिक मुलाणी, सचिन पाटील, अजय इंगवले, ईश्वर परमार, इंद्रजित बोंद्रे, प्रताप जाधव, दुर्वास कदम आदी उपस्थित होते.